पुणे : राज्यसभेची उमेदवारी हे पक्षनिष्ठेचे फलित आहे, अशा शब्दात मेधा कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि कोथरूडच्या माजी आमदार प्रा. कुलकर्णी यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी कुलकर्णी इच्छुक असताना त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आल्याने त्यांचे राजकीय पुनर्वसन पक्षाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, या उमेदवारीमुळे लोकसभा निवडणुकीची राजकीय गणितेही बदलणार आहेत.

राज्यसभेसाठीच्या अधिकृत उमेदवारांच्या नावाची घोषणा भाजपकडून बुधवारी करण्यात आली. त्यामध्ये मेधा कुलकर्णी यांच्या नावाचा समावेश आहे. प्रा. मेधा कुलकर्णी यांनी महानगपालिकेच्या मिळकतकर विभागाकडे ‘नो ड्यूज ’ सर्टीफिकेटसाठी मंगळवारी अर्ज केला आहे. कुलकर्णी यांनी अचानकपणे महापालिकेकडे हा अर्ज केल्याने त्यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली होती.

हेही वाचा…शिंदे गटाकडून मिलिंद देवरांना मोठं गिफ्ट, राज्यसभेची उमेदवारी जाहीर…

राज्यसभेच्या जागांसाठी येत्या महिना अखेर निवडणूक होणार आहे. यामध्ये राज्यातील सहा जागांचा समावेश आहे. यामध्ये केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या वाट्याला पाच जागा येणार आहेत. प्रा. मेधा कुलकर्णी कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या माजी आमदार आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्या कोथरूड मतदार संघातून विजयी झाल्या होत्या. मात्र २०१९च्या निवडणुकीत पक्षाने त्यांचे तिकीट कापून भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यामुळे प्रा. कुलकर्णी काही प्रमाणात नाराज असल्याची चर्चा सुरुवातीच्या काळात सुरू झाली होती.

हेही वाचा…मोठी बातमी! काँग्रेसकडून राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरेंना संधी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पक्षाने अचानक त्यांना उमेदवारी नाकारल्याने या भागातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली होती. उमेदवारी नाकारल्यानंतरही त्यांनी जाहीरपणे कधीही त्यांनी आपली नाराजी बोलून दाखविली नाही. मात्र समाजमाध्यमातून त्यांनी सातत्याने सूचक संदेश दिले होते. चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटन प्रसंगीही त्यांना निमंत्रण न दिल्यावरून मानापमान नाट्य रंगले होते. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी त्यांची समजूत काढली होती.