गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर फुलांना भाविकांकडून मोठी मागणी असते. गणेश प्रतिष्ठापना ते गौरी आवाहन हे दिवस फुलबाजारातील उच्चांकी गर्दीचे ठरतात. गुलटेकडी मार्केट यार्डातील फूलबाजार तर या दिवसात चांगलाच गजबजलेला असतो. यंदाच्या वर्षी पाऊस चांगला झाला असल्याने फुलांची मोठी आवक या बाजारात झाली आहे. मात्र फुलांच्या मागणीतही वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना फुले वाढलेल्या दरांनीच खरेदी करावी लागत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर गुलटेकडीतील मार्केट यार्डात रविवारी (४ सप्टेंबर) ८० ते ९० टन फुलांची आवक झाली. यंदाच्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने पुणे जिल्ह्य़ातील शेतक ऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर फुलांचे पीक घेतले आहे. त्यामुळे फुलांची आवक मोठय़ा प्रमाणावर सुरू झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत फुलांचे दर स्थिर आहेत. हारांसाठी गुलछडी आणि शेवंती या फुलांना चांगली मागणी असते. शेवंतीची आवक यंदा कर्नाटकातून मोठय़ा प्रमाणावर झाली आहे, तर गुलछडीची आवक पुणे जिल्हा तसेच बारामती भागातून होत आहे. गेल्या वर्षी गुलछडीचा प्रतिकिलोचा भाव ३०० ते ४०० रुपये होता. यंदाच्या वर्षी गुलछडीचा भाव ९० ते १५० असा आहे, असे मार्केट यार्डातील फूलबाजारातील प्रमुख विक्रेते सागर भोसले यांनी सांगितले. घाऊक बाजारात आवक वाढल्यामुळे फुलांचे दर घटले असले तरी सर्वसामान्य ग्राहकांसाठी मात्र दर घटलेले नाहीत. किरकोळ बाजारात फुलांचे दर चांगलेच तेजीत होते.

गणेश प्रतिष्ठापना ते गौरी आवाहन या दरम्यान सर्व प्रकारच्या फुलांना मोठी मागणी असते. गौरी आगमनाच्या दिवशी शोभीवंत फुलांचा वापर आरास करण्यासाठी केला जातो. त्यामुळे शोभीवंत फुलांच्या मागणीत वाढ होते. गणेशोत्सवातील पहिले पाच दिवस मागणी जास्त असते. मात्र, विसर्जनाच्या दिवशी त्या तुलनेत फुलांना फारशी मागणी नसते, अशीही माहिती भोसले यांनी दिली.

झेंडू उत्पादक शेतक ऱ्यांची निराशा

यंदा मोठय़ा प्रमाणावर शेतक ऱ्यांनी झेंडूचे उत्पादन केले आहे. सातारा, वाई, सोलापूर तसेच पुणे जिल्ह्य़ातून घाऊक बाजारात झेंडूची मोठी आवक होत आहे. गेले महिनाभर झेंडूला भाव नाही. त्यामुळे झेंडू उत्पादक शेतक ऱ्यांची निराशा झाली आहे. सध्या दहा ते वीस रुपये किलो असा भाव झेंडूला मिळत आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवात झेंडूचा प्रतिकिलोचा दर ४० ते ५० रुपयांवर जाऊन पोहोचला होता, असे निरीक्षण सागर भोसले यांनी नोंदविले.

घाऊक भाव (प्रतिकिलो)

झेंडू- ५ ते २०

गुलछडी- १५० ते ४००

तेरडा- १० ते ३०

गुलाब गड्डी- १५ ते ३०

डच गुलाब- ८० ते१४०

जरबेरा- ४० ते ६०

चमेली- ३०० ते ३५०

जुई- ३००ते ४००

शेवंती- ६० ते १८०

बिजली- ३० ते ७०

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh festival demand pushes flower prices up
First published on: 06-09-2016 at 00:39 IST