पुणे : ग्रामीण भागात शेतीपंपाना वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अटक केली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका भंगार व्यावसायिकासह पाच जणांना अटक केली आहे. चोरट्यांनी भोर, पुरंदरसह जिल्ह्यातील ४२ विद्युत रोहित्रांची तोडफोड करून तांब्याच्या तारा चोरल्याचे समोर आले असून, त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

अब्दुल रेहमान खान (वय ३०), जावेद हदीस खान (वय ३१), सतराम रामदुलारे चौहान (२४), शफीकअहमद अब्दुलरहीम खान (वय ३३, सर्व रा. उत्तरप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पुरंदर आणि भोर तालुका परिसरात शेतीपंपांना वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या रोहित्राची तोडफोड करून त्यातील तांब्याच्या तारा चोरीला जाण्याच्या घटना वाढीस लागल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक जिल्ह्यातील विविध भागांत चोरट्यांचा शोध घेत होते. तपासात माहितीनुसार भंगार माल खरेदी करणारा आरोपी अब्दुल खान याला ताब्यात घेण्यात आले. खान याचा पुणे जिल्ह्यातील आंबेगाव परिसरात भंगार व्यवसाय आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने साथीदारांसह जिल्ह्याच्या विविध भागांत रोहित्राची तोडफोड करून तांब्याच्या तारा चोरी केल्याचे उघडकीस आले. खान याच्यासह चार साथीदारांना पोलिसांनी अटक केली. पुण्यासह सातारा जिल्ह्यात ३६ ठिकाणी महावितरणचे ४२ विद्युत रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा – म्हाळुंगे माण नगर रचना योजनेच्या फेरबदलाची सुनावणी आजपासून

हेही वाचा – राज्यात दहावीची परीक्षा उद्यापासून; विद्यार्थी संख्येत घट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस अधीक्षक अंकित गोयल, बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक निरीक्षक राहुल गावडे, हवालदार सचिन घाडगे, दत्तात्रय तांबे, विजय कांचन, मुकुंद कदम, अजित भुजबळ, धीरज जाधव, समाधान नाईकनवरे, अमोल शेडगे आदींनी ही कारवाई केली.