पुणे : नवीन लाल कांद्याची हंगामातील पहिल्या टप्यातील आवक सुरू झालेली असतानाच नवीन लाल कांद्याला अवेळी पावसाचा फटका बसला आहे. पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील नवीन कांद्याचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असून कांद्याच्या प्रतवारीवरही परिणाम झाला आहे. अवेळी झालेल्या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

नवीन कांद्याचा हंगाम डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात सुरू होतो. सध्या घाऊक बाजारात नवीन लाल कांद्याची आवक सुरू झाली आहे. यंदा कांद्याची लागवड चांगली झाली होती तसेच अवेळी पाऊस झाला नव्हता. मात्र, अचानक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आणि नवीन कांदा लागवड करण्यात येणाऱ्या पुणे, नाशिक आणि नगर जिल्ह्यातील वेगवेगळय़ा भागात बुधवारी (१ डिसेंबर) झालेल्या मुसळधार पावसामुळे नवीन कांद्याचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. लागवड चांगली झाली होती. मात्र, कांदा काढणीस आलेला असताना मुसळधार पाऊस झाला आणि कांदा भिजला. भिजलेल्या कांद्याच्या प्रतवारीवर परिणाम झाला असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी दिली. पुणे जिल्ह्यातील  शिरूर, खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात नवीन लाल कांद्याची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते.

नाशिक तसेच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी भागात नवीन कांद्याची लागवड केली जाते. या भागातील कांदा शेतात भिजला आहे. सध्या घाऊक बाजारात दहा किलो नवीन कांद्याची विक्री प्रतवारीनुसार ५० ते १५० रुपये दराने केली जात आहे. दहा किलो जुन्या कांद्याची विक्री १८० ते २६० रुपये दराने केली जात आहे.

शेतकरी दुहेरी संकटात

अवेळी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका नवीन कांद्याला बसला आहे. काढणीस आलेल्या नवीन कांद्याचे नुकसान झाले आहे. शेतात कांदा भिजलल्याने कांदा खराब झाला असून कांदा सडण्याच्या मार्गावर आहे. यंदाच्या वर्षी कांदा लागवड चांगली झाली होती. कांद्याला चांगले दर मिळतील अशी आशा शेतकऱ्यांना होती. शिरूर बाजारात दहा किलो नवीन कांद्याची विक्री शेतकऱ्यांनी साडेबारा रुपये ते शंभर रुपये दराने केली. खराब कांद्याची मिळेल त्या दरात विक्री करण्यात आली.

हाती पडले १३ रुपये!
सोलापूर : सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीत विकण्यासाठी आणलेल्या २४ क्किंटल कांद्याला जेमतेम भाव मिळाला. वाहतूक भाडे, हमाली, तोलारीचा खर्च वजा जाता हातात फक्त १३ रुपये पडले. आता गावी परत जायला पैसे नाहीत. बापू कवडे या कांदा उत्पादक शेतकऱ्याची ही व्यथा समोर आली. अशा एक ना अनेक शेतकऱ्यांचे रडवेले चेहरे दिसत होते. कांद्याने त्यांचे आर्थिक गणितच बिघडवून टाकले आहे.
अलीकडे सतत अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी आपल्याकडील कांदा आहे त्या परिस्थितीत बाजारात आणत आहेत. यातच करोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणूच्या फैलावामुळे पुन्हा टाळेबंदी लागू होण्याच्या भीतीपोटी शेतकऱ्यांनी कांदा विकण्याची घाई चालविली आहे. अवकाळी पावसामुळे कांद्याची नासाडीही वाढत आहे.
सोलापूर कृषिउत्पन्न बाजारात कांद्याच्या भावाने पार निराशा केल्याने हतबल झालेले अनेक शेतकरी भेटले. परमेश्वर मारूती जाधव (रा. वरकटे, ता. माढा) यांनी २१ क्किंटल कांदा विकायला आणला असता प्रतिक्किंटल केवळ १०० ते १५० रुपये इतकाच भाव मिळाला. त्यानुसार कांद्याला एकूण ८०९.५० रुपये मिळाले. परंतु वाहतूक भाडे-१२५८ रुपये, हमाली-५८.४२ रूपये, तोलाई-३४.८४ रुपये, स्त्री हमाली-२५.२० रुपये याप्रमाणे एकूण खर्च १३७६.५६ रुपये झाला. कांद्याला मिळालेल्या भावापेक्षा खर्च जास्त झाल्यामुळे शेतकरी परमेश्वर जाधव यांनाच उलट ५६७ रुपये देणे झाले. एका शेतकऱ्याने कांदा लागवडीसाठी ३० हजार रुपये खर्च केला होता. प्रत्यक्षात काबाडकष्ट करून वाढविलेला कांदा विकून केवळ नऊ हजार रूपये मिळाले. सत्यवान जालिंदर पाटेकर (रा. अंजनगाव, ता. माढा) या शेतकऱ्याने आणलेल्या २४ क्किंटल कांद्याला प्रतिक्किंटल जेमतेम १०० ते २०० रुपये मिळाला. त्यांना गावी परत जायला जवळ पैसे नव्हते. महादेव वाघमोडे व इतर शेतकऱ्यांचीही हीच व्यथा होती. आडत व्यापारी हाजी सादिक (सत्यम) बागवान यांच्या माहितीनुसार अवकाळी पावसामुळे शेतातील कांदा खराब होत आहे. त्यातच पुन्हा टाळेबंदीच्या भीतीमुळे शेतकरी धास्तावला आहे. त्यातूनच कांद्याची आवक वाढली असून यात खराब कांदा जास्त आहे.

नवीन लाल कांद्याचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असून कांदा खराबही झाला आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या नव्या कांद्याला दर मिळणार आहे. जुन्या कांदाचा साठा मुबलक असला तरी साठवणुकीतील कांद्याच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. जुन्या कांद्यासह चांगल्या प्रतीच्या लाल कांद्याला यापुढील काळात मागणी राहील. चांगल्या प्रतीच्या लाल कांद्याची आवक सुरू होण्यास आणखी काही दिवस लागणार आहेत. खराब कांद्याला चांगले दर मिळणार नाहीत.
रितेश पोमण, कांदा व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लागवड, बियाणे, खते, फवारणी, खुरपणी, कापणी हे खर्च धरून कांदा लागवडीस एकरी खर्च ५० हजार रुपये येतो. खतांच्या किमती वाढलेल्या आहेत. यंदा कांद्याला चांगला दर मिळेल अशी शक्यता वाटत असताना पावसाने तडाखा दिल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.
भाऊसाहेब बबन शेवाळे, कांदा उत्पादक शेतकरी, वरूडे, शिरूर, जि. पुणे