लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंगळवारी (१२ नोव्हेंबर) आगमन होणार असल्याने कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सुरक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा दलाचेही अधिकारी शहरात दाखल झाले आहेत.

पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा स. प. महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे. पुणे पोलिसांसह या दौऱ्याची मुख्य जबाबदारी केंद्रीय सुरक्षा दलाकडे असणार आहे. लोहगाव विमानतळ ते सभा स्थळापर्यंत मार्गाची पाहणी केंद्रीय सुरक्षा दलाच्या पथकांकडून करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

आणखी वाचा-हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका

कार्यक्रम स्थळ, लगतचा परिसर, तसेच सभेच्या ठिकाणची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी वाहतूक विभागाची बैठक घेऊन आढावा घेतला. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांतील पोलीस अधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांना सतर्कचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष शाखा, गुन्हे शाखेची पथके, वाहतूक पोलीस, श्वानपथक, बॉम्बशोधक आणि नाशक पथक बंदोबस्तास राहणार आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली चार अतिरिक्त पोलीस आयुक्त, दहा पोलीस उपायुक्त, २३ सहायक पोलीस आयुक्त, १३५ पोलीस निरीक्षक, ५७० पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत.

आणख वाचा-बंदोबस्ताची रंगीत तालीम; मध्यभागात वाहतूक कोंडी

बंदोबस्ताची रंगीत तालीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंगळवारी शहरात आगमन होणार आहे. सोमवारी पोलिसांनी बंदोबस्ताची रंगीत तालीम घेतली. पंतप्रधानाचा ताफा ज्या मार्गाने जाणार आहे. त्या भागातील रस्त्यांवर पोलिसांनी बंदोबस्ताची रंगीत तालीम घेतली. जंगली महाराज रस्ता, विमानतळ रस्ता, टिळक रस्ता परिसरात सोमवारी सकाळपासून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ड्रोन’ उड्डाणास बंदी

सुरक्षेच्या कारणास्तव मंगळवारी शहरात ड्रोन कॅमेरे, तसेच पॅराग्लायडरच्या उड्डाणास बंदी घालण्यात आली असून, आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिले आहेत. पंतप्रधानांची सभेच्या ठिकाणी ड्रोन कॅमेरे वापरास बंदी घालण्यात आली आहे. पॅराग्लायडर, हलकी विमाने (मायक्रो लाइट एअरक्राफ्ट), हॉट एअर बलूनच्या उड्डाणास बंदी घालण्यात आली आहे.