पुणे : मोसमी पावसाची बंगालच्या उपसागरातील शाखेने वेगाने वाटचाल करीत शुक्रवारी, २३ जून रोजी विदर्भापर्यंत मुसंडी मारली आहे. विदर्भासह तेलंगणा, ओदिशा, छत्तीसगडमध्येही मोसमी वारे दाखल झाले आहे. विदर्भात २७ जूनपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील मोसमी पावसाची शाखा अधिक वेगाने वाटचाल करीत आहे. त्यामुळे मोसमी वारे विदर्भापर्यंत पोहचले आहे.

अरबी समुद्रातील मोसमी वाऱ्याची शाखा सध्या कमजोर आहे. पण, पुढील दोन दिवसात तीही वेगाने वाटचाल करून मोसमी वारे २५ जूनपर्यंत पुणे, मुंबईसह मध्य महाराष्ट्रात दाखल होतील. कोकणात पाऊस जोर धरेल. पण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी असेल. मराठावाड्यात पाऊस सक्रीय होण्यास आणखी काहीकाळ वाट पहावी लागेल. मोसमी वाऱ्याच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान असल्यामुळे पुढील ४८ तासांत मोसमी मध्य प्रदेशात दाखल होतील.

गोंदिया, नागपूरमध्ये हलका पाऊस सुरू

विदर्भात हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात गोंदियात १५ मिमी, नागपुरात १२ मिमी आणि अमरावीत ७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी अकोल्यात ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातील अन्य जिल्ह्यांतील तापमानात घट झाली आहे. २७ जूनपर्यंत कोकण, गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१९ मध्येही थेट विदर्भातच दाखल

मोसमी पाऊस मुंबई, पुण्याला हुलकावणी देऊन थेट विदर्भात दाखल होण्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. २३ जून २०१९ रोजी या वर्षी सारखीच स्थिती निर्माण झाली होती. २०१६ आणि २०१८मध्येही मोसमी पाऊस मुंबई, पुण्यात दाखल होण्यापूर्वी विदर्भात दाखल झाला होता. ज्या वर्षी अरबी समुद्रातील शाखा कमजोर आणि बंगालच्या उपसागरातील शाखा मजबूत असते, त्या वर्षी मुंबई, पुण्याच्या अगोदर मोसमी पाऊस विदर्भात दाखल झालेला दिसून येतो, अशी माहिती डॉ. कश्यपी यांनी दिली आहे.