लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राज्याच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांसह कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत पुढील पाच दिवस पावसाचा जोर राहणार आहे. उर्वरित भागात हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्याच्या अन्य भागांत हलक्या सरींचा अंदाज आहे. हवामान विभागाने शुक्रवारसाठी (५ जुलै) सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला नारंगी अलर्ट दिला असून, दमदार पावसाची शक्यता आहे.

आणखी वाचा-डॉ. भैरप्पा यांची स्पष्ट भूमिका; म्हणाले, मातृभाषेत शिक्षण….

निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅडन ज्यूलियन ऑसिलेशनची (एमजेओ) हवामान प्रणाली विषुववृत्तीय भागातून मार्गक्रमण करीत आहे. ही प्रणाली भारताच्या समुद्रीय क्षेत्रातून २७ जून ते १० जुलै दरम्यान मार्गक्रण करणार आहे. त्यामुळे मोसमी पावसाचा जोर काहीसा वाढला आहे. एमजेओ सध्या बंगालच्या उपसागरात दाखल झाला आहे. त्यामुळे मोसमी पावसाच्या बंगालच्या उपसागरीय शाखेला बळ मिळाले आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर काहीसा वाढण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुक्रवारसाठी इशारा

नारंगी इशारा – सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा