पुणे : गंगाधाम चौकाजवळील आई माता मंदिराजवळील परिसरात अवजड वाहनांच्या वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी अखेर अडथळे उभारण्यास सुरुवात केली. स्थानिक नागरिक आणि राजकीय पक्षांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.गंगाधाम चौकात ११ जून रोजी झालेल्या अपघाताच्या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी १२ जून रोजी याच ठिकाणी उतारावरून भरधाव येणाऱ्या डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे नागरिकांकडून अवजड वाहनांना मज्जाव करणारे अडथळे बसविण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत होती. रास्ता रोको आंदोलनही त्यासाठी करण्यात आले होते.
महानगरपालिकेने वाहतूक पोलिसांच्या परवानगीनुसार अखेर कान्हा हॉटेल आणि आई माता मंदिर चौकाजवळ उंच आणि अवजड वाहनांना मज्जाव करणारे अडथळे बसविण्यास सुरुवात केली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी वाहतूक पोलीस, रस्ते विभागाचे अधिकारी उपस्थित होते.अडथळे बसविताना सामान्य नागरिकांच्या वाहनांची वाहतूक अबाधित राहील, याची दक्षता घेण्याबाबत अमितेश कुमार यांनी सूचना केल्या, तर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी ‘रंबल स्ट्रिप्स’ही रस्त्यावर लावण्याच्या सूचना या वेळी करण्यात आल्या आहेत.
नागरिकांच्या पाठपुराव्याला यश
‘गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करत होतो. महापालिकेला आणि वाहतूक पोलिसांना वारंवार निवेदने दिली, आंदोलने केली. अखेर अडथळे बसविण्यास सुरुवात झाली आहे. नक्कीच अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे थांबणार असून, स्थानिकांना दिलासा मिळाला आहे,’ अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पर्वती विधानसभा अध्यक्ष संतोष नांगरे यांनी व्यक्त केली.