हाॅटेलमध्ये झालेल्या वादातून हाॅटेलमालकाने दोन ग्राहकांवर चाकूने वार केल्याची घटना कात्रज भागात घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करण्यात आली. निशांत जाधव (वय २५, रा. धनकवडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी मनोहर रघुनाथ मांगडे (वय ४४), ऋषिकेश जयसिंग देशमुख (वय ३०, दोघे रा. मांगडेवाडी, कात्रज) यांना अटक करण्यात आली.
जाधव यांनी याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जाधव आणि त्यांचा मित्र मांगडेवाडी भागातील मल्हार फॅमिली रेस्टाॅरंटमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. त्या वेळी जाधव आणि त्यांचा मित्र मोठ्याने गप्पा मारत होते. त्या वेळी हाॅटेलमालक मनोहर मांगडे आणि देशमुख यांनी जाधव यांना मोठ्याने बोलू नका, असे सांगितले. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला.
मांगडे आणि देशमुख यांनी जाधव आणि त्यांच्या मित्रावर चाकूने वार केले. हाॅटेलमधील वेटरने दोघांना बांबूने मारहाण केली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी मांगडे आणि देशमुख यांना अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात तपास करत आहेत.