पुणे : ढगाळ हवामानामुळे मागील काही दिवसांपासून राज्यात कमाल तापमान सरासरी ४० अंशांवर होते. शुक्रवारी पुन्हा तापमानात वाढ झाली. चंद्रपुरात सर्वाधिक ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भात उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात चंद्रपूर येथे सर्वाधिक ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात कमाल तापमान सरासरी ४१.० अंशांवर राहिले. वर्धा, वाशिममध्ये पारा ४२.५ अंशांवर होता.

मराठवाड्यात बीड, नांदेड, परभणी, उदगीरमध्ये पारा ४० अंशांवर राहिला. परभणीत पारा ४२.२ अंशांवर होता. मध्य महाराष्ट्रात सरासरी तापमान ३९ अंशांवर राहिले. जळगावात ४०.६, मालेगावात ४१.० आणि सोलापुरात ४१.२ अंश सेल्सिअस तापमान होते. किनारपट्टीवर कमाल तापमान सरासरी ३३ अंशांवर राहिले. कुलाब्यात ३२.६ तर सांताक्रुजमध्ये पारा ३५.५ अंशांवर होता. दरम्यान, पुढील तीन दिवस विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा अंदाज आहे.

हेही वाचा : उन्हामुळे लिंबाची दरवाढ कायम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्र पुन्हा तापणार

अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त उष्ण वारे कोकण किनारपट्टीवर येत आहे. गुजरातमधून उष्ण वारे उत्तर किनारपट्टी आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात येत आहेत. त्यामुळे पुढील चार दिवस किनारपट्टीवर तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातही पुढील तीन दिवस तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. देशभरात उन्हाळा सर्वोच्च अवस्थेत पोहचला आहे. त्यामुळे देशभरातील तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे. पुढील चार दिवसांत राज्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटसदृश स्थिती निर्माण होऊ शकते, अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली आहे.