पुणे : राज्यात २१ हजार पदांसाठीची शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रक्रियेत आता पुढचे पाऊल पडले असून, मुलाखतीविना नियुक्तीअंतर्गत शिक्षण विभागातर्फे उमेदवारांची निवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. पवित्र संकेतस्थळावर अंतिम केलेले प्राधान्यक्रम, आरक्षण, समांतर आरक्षण, विषयाचा गट, विषय, तसेच विविध न्यायनिवाडे, शासन आदेश इत्यादी सर्व बाबी एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार उमेदवारांच्या उच्चतम प्राधान्यक्रमावर निवडीसाठी शिफारस झाली आहे. उमेदवारांना त्यांची शिफारस पवित्र संकेतस्थळावर पाहता येणार आहे. त्यात व्यवस्थापनाचे नाव आणि शिफारस झालेले पद दिसेल. शिफारसींच्या अनुषंगाने नियुक्ती प्राधिकारी, व्यवस्थापन यांना स्वतंत्रपणे पुढील कार्यवाहीबाबत सूचना देण्यात येत आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा : पुणे : पाषाण-सूस रस्त्यावर अपघात; संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांच्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी संबंधित व्यवस्थापनाची निवड समितीकडून केली जाणार आहे. उमेदवार पात्रतेसंबंधीच्या कागदपत्र पडताळणीत निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र आढल्यास उमेदवारांची निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल. तसेच अशा उमेदवारांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे. उमेदवारांच्या निवडीबाबत काही अडचणी असल्यास राज्यस्तरावर तक्रार निवारण व दुरुस्ती समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यासाठी edupavitra2022@gmail.com या ईमेल वर सबळ पुराव्यांसहित अर्ज सादर करता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.