पिंपरी : महाविकास आघाडीने विजयाची स्वप्ने पाहिली. कुठल्या नेत्याला कुठलं खातं द्यायचं. कोणाला मंत्री पद द्यायचं. कोणाला जेलमध्ये टाकायचं हे सर्व ठरवलं होतं. पण, जनता सुज्ञ असल्याने मतदारांनी आम्हाला कौल दिला. असा दावा माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी पिंपरी- चिंचवडमध्ये व्यक्त केला.

निगडी येथे भाजपचे आमदार शंकर जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी आमदार अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे आदी उपस्थित होते. आमदार महेश लांडगे यांनी सत्तांतराची गोष्ट सांगितली. कॅमेरा बंद करायला लावून अनेक गोष्टींचा लांडगे यांनी उलगडा केला आणि चौफेर फटकेबाजी केली.

हेही वाचा : कौतुकास्पद: पोलिसांसाठी आता ‘पोलीस दवाखाना’; पोलीस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दानवे म्हणाले, विरोधक अद्याप ही हार मानायला तयार नाहीत. ते आता ईव्हीएमला दोष देत आहेत. ते नागरिकांना काही बोलू शकत नाहीत. गेल्या ४५ वर्षात आम्ही अनेक निवडणूका पाहिल्या, लढलो. हार पत्करली. पण, आम्ही कधी संशय घेतला नाही. आता विजयी झालो तर विरोधक ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करत आहेत. लोकसभेत आम्हाला अपयश आलं. हरियाणा, कर्नाटकमध्ये हरलो. तेव्हा आम्ही संशय व्यक्त केला नाही. विरोधकांना पराभवाचे कारण शोधता येत नसल्याने ते ईव्हीएमला दोष देत आहेत, असं मत दानवे यांनी व्यक्त केलं आहे. अमित गोरखे म्हणाले, पिंपरी- चिंचवडमध्ये महायुतीच्या आमदारांची मोठी ताकद आहे. शहराला नक्कीच मंत्रिपद मिळेल अशी आशा व्यक्त केली.