पुणे : तरुणाच्या त्रासामुळे शाळकरी मुलीने किटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. प्रणव सुर्वे (वय २१, रा. म्हातोबाची आळंदी, ता. हवेली, जि. पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत शाळकरी मुलीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार मुलगी दहावीत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून आरोपी प्रणव शाळकरी मुलीचा पाठलाग करत होता. मुलीला अडवून तिला त्रास देत होता. तिच्या शाळेच्या आवारात जाऊन तो तिला धमकावत होता.
तीन दिवसांपूर्वी मुलगी शेतातून निघाली असताना प्रणवने तिला अडवून अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. प्रणवच्या त्रासामुळे मुलगी घाबरली होती. शुक्रवारी (१२ एप्रिल) तिने राहत्या घरात किटकनाशक प्राशन केले. मुलगी अत्यवस्थ झाल्याने तिला कुटुंबियांनी रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तज्ज्ञांनी चौकशी केल्यावर तिने आरोपी प्रणवच्या त्रासामुळे आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. विनयभंग, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये (पोस्को) आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे तपास करत आहेत.
हेही वाचा : स्वर्गप्राप्तीच्या आमिषाने डॉक्टरची पाच कोटींची फसवणूक
त्रासामुळे आत्महत्येचा प्रयत्न करण्याची दुसरी घटना
सिंहगड रस्ता भागातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील तरुणीने तरुणाच्या त्रासामुळे विषारी ओैषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. तरुणाने तिला जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला होता. तरुणीची मोबाइलवर चित्रफीत काढून प्रसारित करण्याची धमकी दिली होती. तरुणाच्या त्रासामुळे तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर लोणी काळभोर परिसरात दहावीतील एका विद्यार्थिनीने तरुणाच्या त्रासामुळे आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. शहरात गेल्या काही महिन्यांपासून समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी, तसेच एकतर्फी प्रेमातून पाठलाग करुन धमकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.