पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाची ताकद वाढल्याने महापालिकेच्या निवडणुकीत भाजपमध्ये जाऊन सत्तेत सहभागी कसे होता येईल? यासाठी आत्तापासूनच प्रयत्न सुरू झाले आहे.
पुणे महानगरपालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र निवडणूक लढविलेल्या भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवत १०० जागा जिंकल्या होत्या. महापालिकेत एकहाती भाजपची सत्ता आली होती. गेल्या साडेतीन वर्षांपासून महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपुष्टात आल्याने महापालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती सोपविण्यात आला आहे. महापालिका आयुक्त हेच प्रशासक म्हणून काम करणार असल्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे सभागृहाची मुदत संपल्यानंतर लोकप्रतिनिधी यांच्याकडे तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांची संख्या देखील कमी झाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका तातडीने घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका आता पुढील काही महिन्यात होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातून सहा जागांवर भाजपचे आमदार विजयी झाले. हडपसर विधानसभा मतदारसंघाची एक जागा महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार चेतन तुपे यांना मिळाली. तर वडगावशेरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे बापूसाहेब पठारे महाविकास आघाडीकडून विजयी झाले.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विधानसभेचे तिकीट नाकारलेले पठारे हे भाजपमध्ये गेले होते. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षामध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली. ते विजयी झाले. मात्र, राज्यात सध्या महायुतीची सत्ता असल्याने मतदारसंघात काम करायला पठारे यांना अडचणी येत आहेत. पठारे हे महाविकास आघाडीकडून निवडून आले असले तरी अनेकदा ते सत्ताधारी असलेल्या महायुतीच्या नेत्यांच्या जाहीर कार्यक्रमासाठी व्यासपीठांवर दिसतात.
महापालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी आमदार पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे हे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरदार सुरू आहे. सुरेंद्र पठारे हे उच्चशिक्षित असून वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात त्यांचे काम मोठे आहे. ते विधानसभेसाठी देखील तयारी करत होते. मात्र, बापूसाहेब पठारे यांना तिकीट मिळाल्याने त्यांचे आमदार होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. महापालिकेच्या निवडणुकीसाठी ते इच्छुक आहेत. राज्यात महायुतीचे सत्ता असल्याने महापालिकेत पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करणार असल्याचे निश्चित आहे. हातात सत्ता असेल तर अनेक कामे मार्गी लागतात, त्यामुळे आमदार पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र भाजपमध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहे.
सुरेंद्र पठारे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांबाबत शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, पक्षात कोण प्रवेश करू इच्छित असेल तर त्याचे स्वागतच आहे. पक्षात कोणी प्रवेश केला की लगेच त्यांना निवडणुकीचे तिकीट मिळेल असे नाही. ज्या भागात भाजपची ताकद कमी आहे. तेथे भाजपचे प्रबळ दावेदार नसतील. अशा ठिकाणी अन्य पक्षातून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीचा विचार होऊ शकतो. मात्र, हा निर्णय प्रदेश पातळीवरील पदाधिकारी घेतील. आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र यांच्या भाजप प्रवेश याबाबतची कोणतीही माहिती अद्याप शहर म्हणून आमच्याकडे आलेली नाही. त्यामुळे सध्या तरी यामध्ये कोणतेही तथ्य नसण्याचे भाजपचे शहराध्यक्ष घाटे यांनी स्पष्ट केले.