पुणे : सिंहगड रस्ता, वारजे, एरंडवणे भागात विद्यार्थ्यांच्या सदनिकेतून महागडे लॅपटॉप, मोबाइल संच, स्मार्ट वॉच चोरणाऱ्या एका तरुणास अटक करण्यात आली. चोरट्याकडून नऊ लॅपटॉप, चार मोबाइल संच, दोन दुचाकी असा चार लाख ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तेजस दत्तात्रय सूर्यवंशी (वय २३, रा. नांदेड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तेजस पुण्यात शिक्षणासाठी आला असून तो एका नामांकित कंपनीत डिलिव्हरी बॉयचे म्हणून काम करत आहे. गेल्या काही दिवसांपासून वारजे भागात विद्यार्थी राहत असलेल्या सदनिकेतून लॅपटॉप चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. याप्रकरणाचा तपास वारजे पोलिसांकडून करण्यात येत होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले होते.

हेही वाचा…प्राण्यांची रेल्वे सुसाट! जाणून घ्या कुत्र्यांसह मांजर, शेळ्या, कोंबड्या कसा करताहेत प्रवास…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तांत्रिक तपासात सूर्यवंशीने लॅपटॉप चोरल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून सूर्यवंशीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने विद्यार्थी राहत असलेल्या सदनिकेतून लॅपटॉप, स्मार्ट वॉच, मोबाइल चोरी केल्याचे उघड झाले. सिंहगड रस्ता, वारजे, एरंडवणे भागात चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. त्याने नांदेड जिल्ह्यातील मुखेडमधून दुचाकी चोरल्याचे तपासात उघडकीस आले. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे, सहायक निरीक्षक रणजीत मोहिते, प्रदीप शेलार, भुजंग इंगळे, बंटी मोरे, संभाजी दराडे, विक्रम खिलारी, अजय कामठे, शरद पोळ यांनी ही कारवाई केली.