पुणे : दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला परिसरातील कला केंद्रात झालेल्या गोळीबार प्रकरणात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आाला. या प्रकरणात पुणे जिल्ह्यातील एका आमदाराचा नातेवाईक सामील असल्याचे समजते. केडगाव चौफुला भागातील एका कला केंद्रात सोमवारी (२१ जुलै) रात्री साडेअकराच्या सुमारास गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. याबाबत कला केंद्राच्या व्यवस्थापकांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. व्यवस्थापकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार प्रकरणात पुणे जिल्ह्यातील एका आमदाराचा नातेवाईक सामील असल्याची माहिती मिळाली. तपासात मिळालेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी बापूराव दडस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रवीण सपांगे या वेळी उपस्थित होते.
केडगाव चौफुला येथील कला केंद्रात सोमवारी रात्री पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. कला केंद्राच्या व्यवस्थापकाला विश्वासात घेण्यात आले. चौकशीत गोळीबार करणाऱ्या आरोपींची नावे निष्पन्न झाली. गोळीबारात कोणी जखमी झाले नाही. अद्याप या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आलेली नाही, असे बिरादार यांनी नमूद केले. कला केंद्रात २१ जुलै चौघे जण सायंकाळी साडेसातच्या सुमारास आले. कार्यक्रम पाहत असताना एकाने त्याच्याकडील पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. गोळीबारानंतर गोंधळ उडाला होता.
कला केंद्रात आलेले रसिक तेथून पळाले होते. कला केंद्रातील गोळीबार प्रकरणाची चर्चा सुरू झाली. गोळीबारात पुणे जिल्ह्यातील एका आमदाराचा नातेवाईक सामील असल्यचाी चर्चा सुरू होती. गोळीबारात कला केंद्रातील एक तरुणी जखमी झाली होती. राजकीय व्यक्ती गोळीबारात सामील असल्याने प्रकरण दडपले जात असल्यची चर्चा सुरू होती. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तपास सुरु करण्यात आला होता. अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी बापूराव दडस यांनी यवत पोलीस ठाण्याला भेट देऊन तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या.