पुणे : गोदाम फोडून २५ लाख रुपयांच्या तांब्याच्या तारा चोरून पसार झालेल्या टोळीला वाघोली पोलिसांनी गजाआड केले. चोरट्यांकडून सहा लाख ४० हजार रुपयांच्या तांब्याच्या तारा, तसेच टेम्पो असा २४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राजेंद्र मोतीचंद जैन (वय ५२, रा. माणकेश्वर बिल्डींग, मुंबई), विनोद श्रीपाल जैन (वय ४०, रा. कामाठीपूरा, मुंबई), सोहेल फिरोज शेख (वय २२, रा. रे रोड, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वाघोली-लोहगाव रस्त्यावरील जैन वेअर हाऊस, रिमश्री काॅपर इंडिया प्रा. लि. या गोदामाचे कुलूप तोडून चोरट्यांनी २५ लाख रुपयांच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्याची घटना २८ फेब्रुवारी रोजी घडली होती. तांब्याच्या तारा चोरुन आरोपी टेम्पोतून पसार झाले होते. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाघोली पोलीस ठाण्यातील तपास पथकाकडून आरोपींचा माग काढण्यात येत होता. पोलिसांनी जवळपास १७२ ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. तांत्रिक तपास, तसेच सीसीटीव्ही चित्रीकरणावरुन पोलिसांनी आरोपींचा माग काढला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपी जैन आणि शेख यांच्याकडून सहा लाख ४० हजार रुपयांच्या तांब्याच्या तारा आणि १८ लाख रुपयांचा टेम्पो जप्त केला. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त हिंमत जाधव, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे, उपनिरीक्षक वैजीनाथ केदार, प्रदीप मोटे, प्रशांत कर्णवर, दीपक कोकरे, विशाल गायकवाड, महादेव कुंभार, साईनाथ रोकडे, पांडुरंग माने, प्रीतम वाघ, समीर भोरडे, मंगेश जाधव, अमोल गायकवाड यांनी ही कामगिरी केली.