पुणे : हे तसे ‘चर्चिले’ शहर म्हणून ओळखले जाते. काही लोक यावरून पुण्याला नावे ठेवतात. पण, चर्चा करणे यात वाद-संवाद दोन्ही अभिप्रेत असते आणि कोणत्याही लोकशाहीत ते आवश्यक असते. पुण्यात तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींपासून महापालिकेच्या वॉर्डस्तरीय निर्णयापर्यंत सगळ्याची चर्चा होऊ शकते. आणि चर्चाही साधीसुधी होत नाही. चर्चेत त्या विषयाच्या अक्षरश: सर्व साली सोलून अर्कापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतो. हे गरजेचे, की बिनगरजेचे हा प्रश्न नाहीच. चर्चेमुळे त्या विषयाचे सर्व पैलू समोर येत असल्याने ती व्हायलाच हवी. प्रश्न, किती ताणायचे हा. पुण्यात सध्या जी हेल्मेटसक्तीवरून चर्चा सुरू आहे, त्याला हा प्रश्न लागू पडतो. दुचाकी चालविणाऱ्यांनी हेल्मेट वापरणे बंधनकारक असावे, की नसावे, याची चर्चा पुणे गेल्या किमान २३ वर्षांपासून करते आहे. सन २००१ मध्ये पुण्यातील सिम्बायोसिस शिक्षण संस्थेच्या कायद्याच्या विद्यार्थ्याने दुचाकीचालकांना हेल्मेटसक्ती करावी, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. या प्रकरणात एकूण आठ याचिकाकर्ते होते. त्यातील एका याचिकाकर्तीने विधी महाविद्यालय रस्त्यावरील अपघाताचा दाखला दिला होता, ज्यात एका दुचाकीचालक तरुणाला हेल्मेट नसल्याने डोक्याला गंभीर इजा झाली होती. हेल्मेट असते, तर ही इजा टाळता किंवा किमान कमी करता आली असती, असे त्यात म्हणणे होते. या संपूर्ण प्रकरणाचे पुढचे तपशील पुन्हा उगाळण्याचे कारण नाही. मुद्दा हा, की तेव्हापासून हेल्मेटसक्तीची चर्चा पुणेकर करतच आहेत. आता नियम सांगतो, की दुचाकी चालविणाऱ्याने आणि त्याच्या मागे बसलेल्या सहप्रवाशाने हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे. मग तरी चर्चा का? तशी कारणे अनेक आहेत. पण, त्यातील समान धागा हा, की हेल्मेट वापरलेच पाहिजे, ही सक्ती कशासाठी? ते वापरावे, की न वापरावे, याचा निर्णय दुचाकी चालविणाऱ्यावर सोडून द्यावा.

विधानसभा निवडणुकीची धामधूम संपून अजून नवीन सरकार येत नाही, तोवर राज्याच्या वाहतूक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांनी विनाहेल्मेट दुचाकीस्वार आणि सहप्रवाशावर कारवाई करण्याचे आदेश राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना दिले. साहजिकच त्याच्या अंमलबजावणीची तयारी सुरू झाली. पुण्यात याचे पडसाद उमटणे स्वाभाविकच होते. ‘कसब्या’चे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने या संदर्भात पोलीस आयुक्तांना जाऊन भेटले. त्यानंतर आयुक्तांनी कारवाईतून तूर्त दिलासा देऊन जनजागृतीवर भर देऊ असे सांगितले. मात्र, एक जानेवारीपासून कारवाई करणार, असेही स्पष्ट केले. म्हणजे हेल्मेटसक्तीच्या नियमाचे उल्लंघन केले, तर दुचाकीस्वार आणि सहप्रवाशावर कारवाई होणार, हे नक्की आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा…शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पाण्याच्या प्रश्नाची सोडवणूक गरजेची,देवेंद्र फडणवीस यांचे मत

आता यावरच्या चर्चेबाबत. खरे तर नियम आहे म्हटल्यावर तो पाळलाच पाहिजे, एवढे साधे या प्रश्नाचे उत्तर आहे. पण, मग चर्चा कशाची? तर, आधी वाहतुकीच्या इतर प्रश्नांवर उत्तरे शोधा, सिग्नल मोडणाऱ्यांना शासन करा, बेदरकार वाहनचालकांवर कारवाई करा आणि मग हेल्मेटसक्तीची कारवाई करा, या प्राधान्यक्रमाची. वाहतूक पोलिसांचे मूलभूत काम आहे वाहतूक नियंत्रणाचे. पुण्यात वाहतूक कोंडीने उग्र रूप धारण केलेले असताना, पुरेशा मनुष्यबळाअभावी वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियमन प्रभावीपणे होत नाही, हे खरेच. त्याला बेदरकार वाहनचालक कारणीभूत आहेतच, पण अनेकदा चौकात वाहतुकीचा बट्ट्याबोळ झालेला असताना, वाहतूक पोलीस एका कोपऱ्यात निवांतपणे किरकोळ नियमभंगासाठीच्या पावत्या फाडताना दिसतात, हेही तितकेच खरे. आता हेल्मेटसह नियमभंगाच्या इतर अनेक कारवाया वाहतूक विभागाने सीसीटीव्ही पडताळूनही केल्या आहेत. मात्र, वाहनचालक ई-चलनांकडे किती काणाडोळा करतात, हे प्रलंबित असलेल्या काही कोटींच्या दंडातून वेळोवेळी समोर येतेच. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आधी वाहतूक नियंत्रण आणि जोडीने सर्वच नियमभंगांवर कारवाई करणे गरजेचे आहेच. ‘नो एंट्री’तून वाहने दामटणारे, सिग्नल मोडणारे, दुचाकीवर तिघा-चौघांना बसवून प्रवास करणारे, रात्री-बेरात्री कर्णकर्कश आवाज करत वाहने चालवणारे अशा सर्वांवरच कठोर कारवाईही आवश्यक आहे. पण, म्हणून आधी ‘ही’ कारवाई करा आणि नंतर हेल्मेटसक्ती करा, या म्हणण्यामागचा तर्क फारसा टिकाव धरणारा नाही. हेल्मेटमुळे केस गळतात, मानेला, मणक्याला इजा होते, असे म्हणणेही अनेकांनी मांडून पाहिले. पण, वर्षानुवर्षे हेल्मेट वापरूनही असे काहीही झाले नसलेले लोकही आहेतच की. हेल्मेट डोक्याच्या सुरक्षिततेसाठी आहे. रस्ते अपघातात डोक्याला इजा होऊन मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येचे वाढते प्रमाण पाहिले, की हेल्मेट का आवश्यक याची खातरी पटेल. काहींचे म्हणणे असे, की वाहतुकीचा वेग अत्यंत संथ असलेल्या शहरात कशाला हेल्मेटसक्ती? फक्त महामार्गांवर करा. असे म्हणणाऱ्यांनी एकदा गोखले रस्ता (फर्ग्युसन रस्ता) आणि जंगली महाराज रस्त्यावर चक्कर मारावी, म्हणजे आता सर्रास वापरल्या जाणाऱ्या दीडशे-तीनशे सीसीच्या बाइक किती वेगाने पळतात, याचा त्यांना अंदाज येईल. अशा वेगात झालेला अपघात जीवघेणा ठरू शकतो, यात शंका नाही.

हेही वाचा…रेल्वेचा गर्दी टाळण्यासाठी पुण्यासह मुंबई अन् इतर ठिकाणी मोठा निर्णय

सरतेशेवटी मुद्दा इतकाच, की वाढलेल्या पुण्यात ३२ लाख दुचाकी धावत आहेत आणि त्यातील बहुतांश १०० सीसी किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या आहेत, ज्या ॲक्सिलरेटर पिळताच सुसाट धावू लागतात. हा वेग आणि डोक्याला नसलेले हेल्मेटचे संरक्षण दरमहा काहीशे बळी घेत असेल, तर त्याला नियमाचे कुंपण आवश्यकच. आणि, हेल्मेटवर गेली २३ वर्षे चर्चा केलेल्या पुण्याने ते पाळणे हिताचेही. siddharth.kelkar@expressindia.com

Story img Loader