पुणे : ठेकेदाराच्या त्रासामुळे कामगाराने चाकूने गळा चिरून आत्महत्या केल्याची घटना वारजे भागात घडली. कामगाराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ठेकेदाराला अटक करण्यात आली. रामविकास जयसिंग चौहान (वय २६, मूळ रा. राधिया देवरिया, जि. कुशीनगर, उत्तर प्रदेश) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सत्येंद्र राजपती चौहान (वय २६, सध्या रा. देशमुखवाडी, शिवणे, मूळ रा. कुशीनगर, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सत्येंद्र चौहान ठेकेदार आहे. तो इमारतींना रंग देण्याचे काम करतो. त्याच्याकडे रामविकास याच्यासह तीन ते चार कामगार कामाला आहेत.
रामविकास याच्या मित्राने सत्येंद्र याच्याकडून २५ हजार रुपये हातऊसने घेतले होते. रामविकासचा मित्र सत्येंंद्र यांच्याकडे कामाला आहे. पैसे न परता करता रामाविकासचा मित्र उत्तर प्रदेशला निघून गेल्याने सत्येंद्र त्याच्यावर चिडला होता. सत्येंद्रने ३० ऑक्टोबर रोजी रात्री रामविकास याच्यासह दोन कामगारांना खोलीत कोंडून ठेवले हाेते. खोलीत काेंडून ठेवल्यानंतर रामविकासने उत्तर प्रदेशात राहणाऱ्या आईला याबाबतची माहिती दिली. सत्येंद्रने त्याच्याकडे पैशांची मागणी करुन शिवीगाळ केली होती. मध्यरात्री रामविकासने स्वयंपाकघरातील चाकूने गळ्यावर चाकूने वार केले, तसेच त्याने पोटावर चाकूने वार केले.
त्यावेळी खोलीत असणाऱ्या कामगारांनी आरडाओरडा केला. गंभीर जखमी झालेल्या रामविकासला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांनाा मिळाली. त्यानंतर रामविकासच्या मित्रांकडे चौकशी करण्यात आली. चौकशीत सत्येंद्रच्या त्रासामुळे रामविकासने आतम्हत्या केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सचिन तरडे तपास करत आहेत.