पुणे : विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात तापमानवाढीचा कल कायम आहे. बुधवारी अकोल्यात सर्वाधिक ४२.८ अंश सेल्सिअसवर गेले आहे. पुढील दोन दिवस तापमानवाढ कायम राहण्याचा अंदाज असून, रात्रीच्या तापमानातही वाढ होऊन उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यावर प्रति चक्रवाताची स्थिती कायम आहे. त्यामुळे मागील चार-पाच दिवसांपासून तापमानात सतत वाढ होत आहे. त्यात आग्नेय दिशेने येत असलेल्या आर्द्रतायुक्त वाऱ्याची भर पडली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस कमाल-किमान तापमानातील वाढीचा कल कायम राहण्याचा अंदाज आहे. बुधवारी अकोला, अमरावती, बुलडाणा, ब्रह्मपुरी, वर्धा, यवतमाळ, बीड, नांदेड, परभणी, जळगाव, जेऊर, मालेगाव, सोलापूर या ठिकाणी ४० अंश सेल्सिअस आणि त्याहून जास्त तापमानाची नोंद झाली आहे.

हेही वाचा : Lok Sabha Elections 2024 : साताऱ्याच्या बदल्यात नाशिक? भाजप-राष्ट्रवादीत अलिखित करार, शिवसेनेत अस्वस्थता

जळगाव, नाशिक, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत पुढील दोन दिवस रात्रीच्या तापमानात वाढ होऊन रात्रीही उकाडा वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना दिवसा आणि रात्रीही असह्य उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.

हेही वाचा : मुंढव्यात बंगल्यात आग; महिलेसह दोघे जखमी – शहरात तीन ठिकाणी आग

विदर्भात हलक्या सरींचा अंदाज

आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे विदर्भात शनिवारी, ३० मार्च रोजी अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर येथे हलक्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भात आकाश अंशतः ढगाळ राहण्याचाही अंदाज आहे.