पुणे : महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उदयनराजे भोसलेंची उमेदवारी निश्चित मानली जात आहे, मात्र साताऱ्याच्या बदल्यात छगन भुजबळ इच्छुक असलेला नाशिक राष्ट्रवादीला दिल्यास शिवसेना नाराज होण्याची शक्यता आहे. महायुतीचे जागावाटप निश्चित झालेले नसताना सातारा, नाशिक आणि माढा लोकसभा मतदारसंघासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी पुण्यात पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

हेही वाचा >>> “बच्चू कडूंसमोर हात जोडून विनंती करतो…”, पत्नीला लोकसभेची उमेदवारी मिळताच रवी राणा नरमले?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही पवार यांची भेट घेतल्याने सातारा आणि नाशिक लोकसभा मतदारसंघात अदलाबदली होईल, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, अजित पवार यांनी सावध भूमिका घेत गुरुवारी (२८ मार्च) सर्व चित्र स्पष्ट होईल, असे सांगितले. महायुतीच्या जागा वाटपात सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार असल्याचे बोलले जात होते. मात्र तेथून भाजपचे उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सातारा आणि नाशिक मतदारसंघांची अदलाबदल करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता आहे.