पुणे : ढोल-ताशा पथकांचा निनादातून झालेली नव्या तालाची ‘आवर्तने’, बँडपथकातील कलाकारांनी वाजविलेल्या भक्तिगीतच्च्या मधूर सुरावटी, नगारावादनासह सनई-चौघड्यांचे मंजूळ सूर, ‘मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष, पारंपरिक पेहरावातील कार्यकर्त्यांचा उत्साह अशा उत्सवी वातावरणात शनिवारी  वाजत गाजत गणरायाचे स्वागत करण्यात आले. मानाच्या गणपती मंडळांच्या गणरायाची विधिवत मुहुर्तावर प्रतिष्ठापना करण्यात आली. शहरातील सर्व गणेश मंडळांनी पारंपरिक मार्गावर गणरायाच्या आगमनाची छोटेखानी मिरवणूक काढली. मिरवणुकीमध्ये दोनदा पावसाची सर आल्यानंतरही कार्यकर्त्यांचा आणि पथकातील वादकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता.

अकरा दिवसांच्या आनंदपर्वाची गणेश चतुर्थीला गणरायाची प्रतिष्ठापना करून सुरुवात झाली. घरोघरी चैतन्यपूर्ण वातावरणात श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. घरातील गणरायाची प्रतिष्ठापना करून गुरुजींची मंडळांच्या गणेश मूर्तीच्या प्रतिष्ठापनेची वेळ गाठण्याची लगबग सुरू होती. पूजा साहित्य खरेदीबरोबरच हार, फुले, तुळस, शमी, केवड्याचे पान, कमळ, पाच फळांचा वाटा खरेदी करण्यासाठी मंडई परिसरात गर्दी झाली होती. घरातील गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर कार्यकर्ते आणि ढोल-ताशा पथकातील वादक युवक-युवती पारंपरिक पेहराव परिधान करून मंडळांच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झाले.

eknath shinde
Ratan Tata Death : “नैतिकता जपत उद्योगाबरोबरच देश अन् समाजाचा विकास करण्याची विचारधारा…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रतन टाटांना वाहिली श्रद्धांजली!
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
Bhoomipujan of Naina projects tomorrow by Prime Minister
नैना’प्रकल्पांचे उद्या भूमिपूजन, पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजनानंतर शेतकऱ्यांचा रोष वाढण्याची शक्यता
Navi Mumbai, Naina area, PM Narendra Modi,
नवी मुंबई : नैना क्षेत्रातील २५०० कोटी रुपयांच्या कामाचे पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन
Vidhan Sabha Election 2024
अजित पवारांच्या पक्षाला अपेक्षित यश मिळविण्यात अडचणी- ज्योतिषांची भविष्यवाणी
cpm polit bureau
सीताराम येचुरींच्या निधनानंतर महासचिवपदी कोणाची निवड होणार? ‘ही’ नावे आहेत चर्चेत!
In Badlapur case accused Akshay Shinde Thane alleged encounter
चकमकी अखेर पोलिसांवरच का शेकतात?
tirupati temple animal fat in laddoos row
चंद्राबाबू नायडूंच्या आरोपानंतरही तिरुपती मंदिरातील लाडूच्या विक्रीवर परिणाम नाही; गेल्या चार दिवसांत विकले गेले तब्बल ‘इतके’ लाडू

हेही वाचा: Ganesh Chaturthi 2024: शंखनाद, ढोल-ताशा अन् लेझिम! प्रसन्न वातावरणात पुण्यातील पहिले पाच मानाचे गणपती विराजमान, पाहा फोटो

श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट

ग्रामदैवत आणि मानाचा पहिला श्री कसबा गणपतीची मिरवणूक उत्सव मंडपातून सकाळी सव्वाआठ वाजता सुरू झाली. फडके हौद, दारूवाला पूल, देवजीबाबा चौक, रास्ते वाडा, जिवा महाले चौक (अपोलो चित्रपटगृह) मार्गे रास्ता पेठ येथे मूर्तिकार अभिजित धोंडफळे यांच्याकडून गणेश मूर्ती घेऊन ती पारंपरिक चांदीच्या पालखीत विराजमान झाली. पुन्हा त्याच मार्गाने मिरवणूक उत्सव मंडपात आल्यानंतर कोल्हापूर येथील श्री सिद्धगिरी मठाचे (कणेरी मठ) मठाधिपती आणि विश्वस्त अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांनी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रभात बँडपथक, संघर्ष, श्रीराम पथक आणि शौर्य ढोल-ताशा पथक यांचे बहारदार वादन मिरवणुकीच्या अग्रभागी होते.

श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

ग्रामदेवता आणि मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाची प्रतिष्ठापना श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांच्या हस्ते दुपारी १२ वाजून ११ मिनिटांनी करण्यात आली. त्यापूर्वी सकाळी दहा वाजता उत्सव मंडपातून मिरवणूक सुरू झाली. न. चिं. केळकर रस्त्यावरील मूर्तिकार गुळुंजकर यांच्याकडून गणेश मूर्ती घेऊन ती चांदीच्या पालखीत विराजमान होताच ‘मंगलमूर्ती मोरया’चा गजर झाला. कुंटे चौक, नगरकर तालीम चौक, अप्पा बळवंत चौक मार्गे मिरवणूक उत्सव मंडपात पोहोचली. आढाव बंधूंचे नगारावादन आणि न्यू गंधर्व ब्रास बॅण्डपथकाचे वादन, शिवमुद्रा आणि ताल ढोल-ताशा पथक आणि विष्णुनाद शंखपथकाचा मिरवणुकीमध्ये सहभाग होता. स्वानंद निवास या काल्पनिक गणेश प्रासादातील चांदीच्या देव्हाऱ्यामध्ये गजानन विराजमान झाले.

श्री गुरुजी तालीम मंडळ

फायबर ग्लासमध्ये साकारलेल्या आकर्षक गजमहालामध्ये श्री गुरुजी कालमी या मानाच्या तिसऱ्या गणपतीची युवा उद्योजक पुनीत बालन आणि जान्हवी धारिवाल-बालन यांच्या हस्ते दुपारी १ वाजून ३१ मिनिटांनी प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यापूर्वी सुभाष सरपाले आणि स्वप्नील सरपाले यांनी साकारलेल्या फुलांच्या गजरथातून सकाळी साडेदहा वाजता मिरवणूक सुरू झाली. गुरुजी तालीम मंदिर, गणपती चौक, लिंबराज महाराज चौक, अप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी चौक आणि बुधवार चौक, बेलबाग चौक या मार्गाने मिरवणूक उत्सव मंडपात आली. जयंत नगरकर यांचे नगारावादन, अश्वराज ब्रास बँड, गुरुजी प्रतिष्ठान, रुद्रांग, आवर्तन या तीन ढोल-ताशा पथकांच्या वादनाने मिरवणुकीत रंग भरले. सुशील निगडे आणि विकास पवार यांनी फायबर ग्लासधील गजमहाल साकारला आहे.

हेही वाचा: Ganesh Utsav 2024 : श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे थाटात आगमन! सिंह रथातून निघाली मिरवणूक, ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाचे स्वागत, पाहा Viral Video

श्री तुळशीबाग गणपती मंडळ ट्रस्ट

ओडिशातील पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये मानाच्या चौथ्या श्री तुळशीबाग गणपतीची प्रतिष्ठापना दुपारी साडेबारा वाजता उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते करण्यात आली. त्यापूर्वी पेशवेकालीन श्रीराम मंदिरापासून प्रभू श्रीरामचंद्राच्या पालखीतून सकाळी प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. लोणकर बंधूंचा नगारा वादनाचा गाडा, शिवगर्जना आणि विघ्नहर्ता ढोल-ताशा पथकाचा सहभाग असलेली मिरवणूक गणपती चौक, लक्ष्मी रस्त्याने नगरकर तालीम चौक, आप्पा बळवंत चौक, बुधवार चौक, बेलबाग चौक, लक्ष्मी रस्त्याने गणपती चौकातून तुळशीबागेत मिरवणूक  उत्सव मंडपात आली.

केसरीवाडा गणेशोत्सव

मानाचा पाचवा गणपती असलेल्या केसरीवाडा गणेशोत्सव मिरवणुकीची सकाळी साडेनऊ वाजता रमणबाग चौकातून होणार आहे. प्रथेप्रमाणे पालखीतून मिरवणूक काढण्यात आलेल्या मिरवणुकीत गंधाक्ष आणि श्रीराम ढोल-ताशापथकाच्या वादनाने रंग भरला गेला. रोनत रोहित टिळक यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. केसरी-मराठा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक, डॉ. गीताली टिळक, रोहित टिळक, डॉ. प्रणती टिळक या वेळी उपस्थित होत्या.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या गणरायाची प्रसिद्ध गायक कैलास खेर यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यापूर्वी सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी मिरवणुकीला सुरुवात झाली. लाठीकाठीची प्रात्यक्षिके, शिखंडी, शिवमुद्रा, वाद्यवृंद, मानवंदना, श्री, नुमवि, कलावंत, श्रीराम ढोल-ताशा पथकांच्या वादनाचा निनाद अनुभवावयास मिळाला. भाऊसाहेब रंगारी भवन, बुधवार चौक, आप्पा बळवंत चौक, दक्षिणमुखी मारुती मंदिरमार्गे मिरवणूक आल्यानंतर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. ट्रस्टचे उत्सवप्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांच्या हस्ते गायक कैलास खेर यांचा सन्मान करण्यात आला.

हेही वाचा: पुणे: गणेशोत्सवात भाविकांसाठी २७ ठिकाणी वाहने लावण्याची व्यवस्था

अखिल मंडई मंडळ

आकर्षक फुलांनी सजलेल्या त्रिशुल-डमरू रथावर गणेशभक्तांनी केलेली पुष्पवृष्टी, ढोल-ताशांच्या गजरात अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची मिरवणूक निघाली. मंडई पोलीस चौकी, हुतात्मा बाबू गेनू चौक, रामेश्वर चौक या मार्गाने मिरवणूक उत्सव मंडपात आली. मिरवणुकीच्या अग्रभागी न्यू गंधर्व बॅँड पथक, स्वराज्य आणि सामर्थ्य ही ढोल-ताशा पथके होती. विशाल ताजणेकर यांनी साकारलेल्या पाषाणात कोरलेल्या पुरातन शिवालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डाॅ. पराग काळकर आणि अंजली काळकर यांच्या हस्ते शारदा गजाननाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट

हिमाचल प्रदेशामधील जटोली शिवमंदिराच्या प्रतिकृतीमध्ये हुमनाबाद (कर्नाटक) येथील श्री दत्त संप्रदायाचे श्री ज्ञानराज महाराज माणिकप्रभू यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यापूर्वी सकाळी साडेआठ वाजता गणपती मंदिरापासून सिंह रथातून गणरायाची मिरवणूक झाली. देवळणकर बंधूंचा चौघडावादनाचा गाडा, गायकवाड बंधूंचा सनईवादनाचा गाडा मिरवणुकीच्या अग्रभागी होता. दरबार, प्रभात, मयूर ही तीन बँडपथके आणि गंधाक्ष ढोल-ताशा पथकाचा सहभाग असलेली मिरवणूक आप्पा बळवंत चौक, नगरकर तालीम चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा, हुतात्मा बाबू गेनू मंडळ रस्तामार्गे मिरवणूक उत्सव मंडपात आली. प्रतिष्ठापनेनंतर भाविकांना गणरायाचे दर्शन घेण्यासाठी आणि गणरायाला श्रीफळाचे तोरण अर्पण करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.