पुणे : मागील काही काळात घरांच्या किमती आणि व्याजदरात वाढ झालेली असतानाही ग्राहकांचा कल मध्यम व मोठ्या आकाराच्या घरांकडे असल्याचे समोर आले आहे. टूबीएचकेपेक्षा थ्रीबीएचकेला ग्राहकांकडून प्राधान्य दिले जात आहे. अनारॉक ग्रुपच्या पहिल्या सहामाहीतील सर्वेक्षणात मध्यम व मोठ्या घरांना ५९ टक्के ग्राहकांनी पसंती दर्शविली आहे.

मध्यम ते मोठ्या आकाराच्या घरांमध्ये ४५ लाख ते १.५ कोटी रुपये किमतीच्या घरांचा समावेश होतो. अनारॉकने पाच हजार २१८ ग्राहकांचे सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार मध्यम आणि मोठ्या आकाराच्या घरांना ५९ टक्के ग्राहकांनी पसंती दर्शविली आहे. हे प्रमाण २०२० च्या पहिल्या सहामाहीतील सर्वेक्षणापेक्षा १० टक्क्यांनी वाढले आहे. यंदा ४५ ते ९० लाख रुपये किमतीच्या घरांना सर्वाधिक ३५ टक्के ग्राहकांनी पसंती दिली आहे. त्याखालोखाल २४ टक्के ग्राहकांनी ९० लाख ते १.५ कोटी रुपये किमतीच्या घरांना प्राधान्य दिले आहे.

आणखी वाचा-महिला प्रवाशांचे ‘जाऊ बाई जोरात’! एसटीतून सवलतीत पहिल्या ६ महिन्यांत तब्बल एवढ्या जणींचा प्रवास

देशात बंगळुरूमध्ये सर्वाधिक ५१ टक्के ग्राहकांची थ्रीबीएचकेला पसंती आहे. त्याखालोखाल हे प्रमाण चेन्नई ५० टक्के, दिल्ली ४७ टक्के, पुणे ४५ टक्के असे आहे. कोलकता, मुंबई आणि हैदराबादमध्ये टूबीएचकेला अधिक प्राधान्य आहे. टूबीएचकेला कोलकत्यात ५२ टक्के, मुंबईत ४१ टक्के, हैदराबादमध्ये ४७ टक्के ग्राहकांनी पसंती दिल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

मागील वर्षी पहिल्या सहामाहीतील सर्वेक्षणात थ्रीबीएचकेला पसंती देणाऱ्यांची संख्या ४१ टक्के होती. त्यात आता वाढ होऊन हे प्रमाण ४८ टक्क्यांवर पोहोचले आहे. टूबीएचकेपेक्षा थ्रीबीएचके घरांना मागणी वाढली आहे. टूबीएचकेला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या ३९ टक्के आहे. करोना संकटानंतर गृहनिर्माण क्षेत्र पूर्वपदावर आले आहे. मध्यम व मोठ्या आकाराच्या घरांना मागणी त्यानंतरही टिकून राहिली आहे, असे अनारॉक ग्रुपचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा-पुणे: संघाची समन्वय समितीची महत्वपूर्ण बैठक पुण्यात, अमित शाह उपस्थित रहाणार…

सर्वेक्षणातील ठळक मुद्दे

  • व्याजदरात आणखी वाढ झाल्यास गृहखरेदीच्या निर्णयावर परिणाम
  • गुंतवणुकीसाठी ६० टक्के जणांचा मालमत्ता क्षेत्राकडे कल
  • मिलेनियल्सकडून गुंतवणुकीतील परताव्यातून घराची खरेदी
  • गुंतवणुकीऐवजी स्वत:च्या वापरासाठी घरखरेदीचे प्रमाण जास्त
  • आपल्या परिसरातच घर असावे असा आग्रह दिवसेंदिवस कमी
  • एकूण घरांच्या मागणीत परवडणाऱ्या घरांची मागणी २५ टक्क्यांवर