लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे इंटेलिजन्स युनिट आणि गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने संयुक्तपणे शुक्रवार पेठ परिसरात छापा टाकून २ लाख १४ हजार रुपये किमतीचे मेफेड्रॉन (एमडी) जप्त करून चौघांना अटक केली आहे. त्यांचा एक साथीदार फरार आहे. रोनित बिपिन खाडे (वय १९, रा. सिंहगड रस्ता, हिंगणे), चैतन्य शिवाजी सावले (वय २७, रा. किरकटवाडी), सार्थ वीरेंद्र खरे (वय १९, रा. आनंदनगर, सिंहगड रस्ता), विशाल कमलेश मेहता (वय १९, रा. सिंहगड रस्ता) यांना अटक करण्यात आली आहे. तर अनुश जोतिबा माने (रा. घोरपडे पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी  पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लक्ष्मण घोरपडे यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना बुधवारी (१ नोव्हेंबर) दुपारी चारच्या दरम्यान घडली.

हेही वाचा >>> पुण्यातून विदेशी मद्याची तस्करी..! एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, शुक्रवार पेठ परिसरात काहीजण मेफेड्रॉन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती दक्षिण मुख्यालयाच्या इंटेलिजन्स युनिटला मिळाली. या युनिटने पोलिसांच्या मदतीने रात्री छापा टाकून चारजणांना ताब्यात घेतले. हे मेफेड्रॉन घोरपडे पेठ येथे राहणारा अनुश माने याच्याकडून विक्री करीत आणल्याचे समोर आले आहे. आरोपींकडून २ लाख १४ रुपये किमतीचा १० ग्रॅम ७० मिलिग्रॅम  मेफेड्रॉन आणि चार मोबाईल असे ३ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलीस अंमलदार प्रवीण उतेकर, पांडुरंग पवार, मारुती पारधी, मनोज साळुंके, विशाल दळवी, विशाल शिंदे, योगेश मोहिते यांच्या पथकाने ही कारवाई केली.