महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटना मतदारांनी विसरू नये

पुणे : भाजपच्या नेत्यांकडून महिला खेळाडूंना शोषणाला बळी पडावे लागले आहे. त्यामुळे महिलांना आणि महिला खेळाडूंना न्याय मिळावा, यासाठी राजकारणात प्रवेश केला असल्याचे सांगत हरियाणातील काँग्रेसच्या आमदार आणि प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगट यांनी आता महायुती सरकारच्या काळात महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटना मतदारांनी विसरू नये, असे आवाहन केले.

काँग्रेस भवन येथे सोमवारी विनेश फोगट यांची पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये त्यांनी भाजपचा समाचार घेतला. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रीय प्रवक्त्या शमा महंमद, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, माजी आमदार दीप्ती चवधरी आणि शहर काँग्रेसच्या क्रीडा सेलचे अध्यक्ष आशुतोष शिंदे यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>> मला मत म्हणजे भाजपला नव्हे! अजित पवार यांच्याकडून आरोपांचे खंडन

भाजपने मतांसाठी विकासाचा प्रचार केला असता तर खेळाडू म्हणून मीदेखील दाद दिली असती. महिला खेळाडूंंना न्याय मिळावा यासाठी आम्ही संघर्ष केला. आता महिलांंना न्याय मिळावा, यासाठी राजकारणात प्रवेश केला आहे. महायुती सरकारच्या काळात महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटना मतदारांनी विसरू नये, असेही फोगट म्हणाल्या.

हेही वाचा >>> महाविकास आघाडीने कल्याणकारी योजनांना स्थगिती दिल्याने राज्याचा विकास खुंटला – केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचा आरोप

शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. महिलांवर अत्याचार वाढले आहेत. भाजप आणि महायुती सरकारच्या काळात महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत. भाजपचे नेते ‘एक हैं तो सेफ हैं’ अशी घोषणा देतात. पण दुसरीकडे देशातील महिला सुरक्षित आहेत का? नेते महिलांचे शोषण थांबवतील तेव्हा महिला सुरक्षित होतील. नेत्यांकडून महिला खेळाडूंना शोषणाला बळी पडावे लागले आहे, असा आरोपही फोगट यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय जनता पक्षाचे जाती-धर्मावर समाजाची विभागणी करण्याचे काम सुरू आहे. भाजपचे नेते जाती आणि धर्मावरून समाजामध्ये भांडणे लावत आहेत. देशात द्वेष पेरण्याचे काम भाजपने केले आहे. सरकारने काय काम केले हे सांगण्याऐवजी भाजप निवडणुकीत लोकांमध्ये भांडणे लावण्यामध्येच अडकला असल्याची टीका फोगट यांनी केली. भाजप सत्तेत येण्याआधी देशातील निवडणूक चांगल्या वातावरणात होत होत्या. भाजपने समाजामध्ये द्वेष पेरल्यामुळे राजकारणाची पातळीही खालावली आहे. महायुती सरकार सामान्यांच्या कल्याणासाठी काम करत नाही. हिंदू-मुस्लिम भेद करून निवडणूक जिंकता येत नाही, असेही त्या म्हणाल्या.