पुणे : ‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’कडून (आयआरसीटीसी) सुरू करण्यात आलेल्या पर्यटन रेल्वे सेवेंतर्गत ‘उत्तर भारत देवभूमि यात्रा गुरुकृपासह’ या विशेष रेल्वेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या गुरुवारी (१७ एप्रिल) पुण्यातून ही विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे.ही यात्रा सुमारे पाच हजार किलोमीटर अंतराची असून, हरिद्वार, हृषीकेश, अमृतसर, वैष्णोदेवी (कटरा), मथुरा, वृंदावन आणि आग्रा यांसारख्या महत्त्वाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देऊन दहा दिवसांनी ती पुन्हा पुण्यात येणार आहे.
‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वानुसार आरक्षण करण्यात येणार असून, ७५० आसनक्षमता निश्चित करण्यात आली आहे. इच्छुकांना पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण, वसई रस्ता, वापी, सूरत, बडोदा या रेल्वे स्थानकांवरून रेल्वेत बसता येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, केंद्र शासनाच्या ‘देखो अपना देश’ या योजनेंतर्गत ‘भारतगौरव’ ही विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेद्वारे देशभरातून आतापर्यंत ८६ गाड्या सोडण्यात आल्या आहेत. जानेवारी महिन्यात उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील महाकुंभनिमित्त ‘भारत गौरव’ची विशेष रेल्वे सोडण्यात आली होती. या रेल्वेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच धर्तीवर ‘उत्तर भारत देवभूमि यात्रा गुरुकृपासह’ या विशेष यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
या स्थळांना भेट
हरिद्वार : हृषीकेश, हर की पौडी, गंगा आरती
अमृतसर : सुवर्ण मंदिर, वाघा बॉर्डर
कटरा : माता वैष्णोदेवी दर्शन
मथुरा : वृंदावन, श्रीकृष्ण जन्मभूमी आणि प्रमुख मंदिरे
आग्रा : ताजमहाल
प्रतिप्रवासी शुल्क
सामान्य श्रेणी (शयनयान) : रु. १८ हजार २३०
तृतीय श्रेणी (थ्री टीअर) : रु. ३३ हजार ८८०
द्वितीय श्रेणी (टू टीअर) : रु. ४१ हजार ५३०
प्रवाशांसाठी सुविधा
वातानुकूलित सुविधा आणि राहण्याची व्यवस्था
शाकाहारी भोजन (चहा, नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण)
पर्यटनस्थळी उतरल्यानंतरही वातानुकूलित वाहनाची व्यवस्था
विविध धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांची माहिती देण्यासाठी मार्गदर्शक (गाइड)