नारायणगाव : हिवरे तर्फे नारायणगाव (ता. जुन्नर) येथे उष्माघाताने येथे दीड वर्षाच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. उष्माघाताने बिबट्याचा मृत्यू होण्याची जुन्नर तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे, अशी माहिती जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांनी दिली.
हिवरे तर्फे नारायणगाव येथील भोरवस्ती परिसरात संतोष दत्तात्रय भोर यांचे गव्हाचे शेत आहे. या शेतामध्ये शनिवारी सकाळी आठच्या सुमारास दीड वर्षे वयाचा मृत बिबट्या आढळून आला. स्थानिक शेतकरी नितीन भोर व रेस्क्यू टीम सदस्य किरण वाजगे यांनी ही माहिती वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांना दिली. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृत बिबट्याला शवविच्छेदनासाठी माणिकडोह येथील बिबट आरोग्य केंद्रात पाठविले. शवविच्छेदनानंतर उष्माघाताने या बिबट्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याचे शिंदे यांनी सांगितले. वनरक्षक रामेश्वर फुलवाड, वन कर्मचारी खंडू भुजबळ, विश्वास शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
हेही वाचा – पिंपरी : रहाटणीत पावणेदोन लाखांची रोकड जप्त
हेही वाचा – मरणासन्न रेडिओ आकाशगंगांचा शोध, खगोलशास्त्रांचे शास्त्रज्ञांचे संयुक्त संशोधन
दरम्यान, या भागात आणखी बिबटे असून त्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी स्थानिक शेतकरी वसंत भोर, संतोष भोर, नितीन भोर, ईश्वर अडसरे, रामदास भोर, ओंकार भोर, प्रसाद भोर, तानाजी भोर, बाळू भोर यांनी केली.