बंगालच्या उपसागरामधील कमी दाबाच्या क्षेत्राचे बुधवारी (७ डिसेंबर) संध्याकाळी उशिरा चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. हे चक्रीवादळ प्रामुख्याने दक्षिणेकडील राज्यांत तडाखा देण्याची शक्यता आहे. मात्र, त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार आहे. ९ ते ११ डिसेंबर या कालावधीत काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहणार असून, तापमानातील वाढही कायम राहण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- लम्पीबाधित पशूंवर ऑनलाइन उपचार; पुणे जिल्हा परिषदेचा अनोखा उपक्रम

बंगालच्या उपसागरामध्ये दक्षिण-पश्चिम भागामध्ये दोन दिवसांपासून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. त्याची तीव्रता सातत्याने वाढत गेल्याने त्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. या चक्रीवादळाची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे समुद्रात ताशी ८० ते १०० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. बुधवारी रात्री हे चक्रीवादळ चेन्नई शहरापासून समुद्रामध्ये दक्षिण-पूर्व दिशेला सुमारे ७०० किलोमीटर अंतरावर होते. चक्रीवादळाचा संभाव्य मार्ग उत्तर-पश्चिम दिशेने आहे. गुरुवारी (८ डिसेंबर) सकाळी हे चक्रीवादळ आंध्र प्रदेश, तमिळनाडूच्या किनारपट्टीजवळ असणार आहे. या कालावधीत त्याची तीव्रता अधिक असेल.

हेही वाचा- पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या बंद ;आंदोलनात छत्रपती संभाजीराजेंचा सहभाग

चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकल्यानंतर त्याची तीव्रता हळूहळू कमी होणार असली, तरी त्याचा परिणाम ११ डिसेंबरपर्यंत राहणार आहे. ९ डिसेंबरला दक्षिणेकडे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या सर्वांचा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील अनेक भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागांत ९ ते ११ डिसेंबर या कालावधीत, तर मराठवाड्यात १० डिसेंबर आणि विदर्भात काही भागांत ११ डिसेंबरला हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

हेही वाचा- पुणे : बौद्ध पारिभाषिक शब्दकोशात आता चिनी भाषेचाही समावेश 

तापमानातील वाढ कायम

राज्याच्या सर्वच भागामध्ये सध्या रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत हलका गारवा असला, तरी थंडी गायब झाली आहे. दक्षिणेकडील पावसाळी स्थितीचा सध्या परिणाम होत आहे. चक्रीवादळाच्या कालावधीत राज्याच्या बहुतांश भागांत ढगाळ स्थिती राहणार आहे. त्यामुळे रात्रीच्या तापमानाची वाढ कायम राहणार आहे. सध्या दिवसाच्या कमाल तापमानातही मोठी वाढ होत असून, कोकणात देशातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद होत आहे. रत्नागिरी येथे बुधवारी उच्चांकी ३४.५ अंश कमाल तापमान नोंदविले गेले. पावसाळी स्थितीमुळे दोन दिवसांत दिवसाच्या तापमानात घट होईल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Light rain likely in some parts of maharashtra from december 9 to 11 due to cyclone in bay of bengal pune print news pam 03 dpj
First published on: 07-12-2022 at 21:01 IST