दत्ता जाधव
पुणे : बंगालच्या उपसागरात वाऱ्याची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. सोमवार, २३ ऑक्टोबरपर्यंत त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर कमी दाबाच्या क्षेत्राचे मार्गक्रमण कसे राहील, याचा अंदाज बांधणे शक्य होईल.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ येमेनच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. त्यामुळे या चक्रीवादळाचा पश्चिम किनारपट्टीवर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही. किनाऱ्यावर काही काळ वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात सोमवारपर्यंत तयार होणाऱ्या संभाव्य कमी दाबाच्या क्षेत्राच्या मार्गक्रमणाविषयी आताच अंदाज बांधणे शक्य नाही. पण, ते आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे वाटचाल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आणखी वाचा-लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागा! राज ठाकरेंकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा
विदर्भवासीयांना उकड्यापासून काहीसा दिलासा
विदर्भातील पारा मागील काही दिवसांपासून ३५ अंश सेल्सिअसवर होता. शुक्रवारी अकोल्यात ३५.७ अंश सेल्सिअस तापमान होते. अकोलावगळता अन्य ठिकाणी कमाल तापमानात एक ते दीड अंश सेल्सिअसने घट झाली आहे. त्यामुळे विदर्भवासीयांना उकाड्यातून काहीसा दिलासा मिळाला आहे. नागपुरात कमाल तापमान ३२.६ अंशांवर होते. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात तापमानात घट झालेली नाही. मुंबईत कुलाब्यात ३४.५, तर सातांक्रुझमध्ये ३५.९ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. डहाणूत सर्वाधिक ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.