पुणे : दिवाळीनिमित्त मंगळवारी (२१ ऑक्टोबर) सायंकाळी सहा वाजल्यानंतर मेट्रो बंद ठेवण्यात येणार आहे. लक्ष्मीपूजनानिमित्त पहाटे सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच दोन्ही मार्गांवरील सेवा कार्यरत ठेवण्याचा निर्णय मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनने (महामेट्रो) घेतला आहे. बुधवार (२२ ऑक्टोबर) पासून रात्री ११ वाजेपर्यंत सेवा सुरू राहणार असल्याचे महामेट्रोने जाहीर केले.

दिवाळी सणानिमित्त शाळा-महाविद्यालय, खासगी, सरकारी कार्यालयांना पुढीच तीन ते चार दिवस सुट्या आहेत. त्यातच पुण्यात नोकरी, व्यवसाय, शिक्षण, रोजगारानिमित्त परगावावरून आलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. सुट्या असल्याने मूळ गावी किंवा पर्यटनासाठी बाहेर गेलेल्यांचे प्रमाणही तेवढ्याच प्रमाणात आहे. दर वर्षी दिवाळीमध्ये दोन ते तीन दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मागणी नसते.

स्वारगेट ते पिंपरी चिंचवड (पर्पल लाइन) आणि वनाज ते रामवाडी (एक्वा लाइन) या मार्गांवर दैनंदिन पहाटे सहा ते रात्री ११ वाजेपर्यंत अखंडित १७ तास मेट्रो धावत असते. मेट्रोकडे एकूण ३४ गाड्या असून, प्रति सहा ते सात मिनिटांनी अशा दिवसभरातून सरासरी ५५४ फेऱ्या होतात. यापैकी पर्पल लाइनवर ३००, तर एक्वा लाइनवर २५४ फेऱ्या होतात. मात्र, २१ ऑक्टोबर रोजी केवळ १२ तासांपुरतीच सेवा असल्याने दिवसभरातून अंदाजे ३५०-४०० फेऱ्या (३० ते ४० टक्के) कमी होण्याची शक्यता महामेट्रोकडून वर्तविण्यात आली.

पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या सरासरी दोन लाखांपर्यंत असते. दिवाळीच्या काळात प्रवासी संख्येवर मोठा परिणाम दिसून येतो. मागील दिवाळीच्या सुट्यांमध्ये तब्बल १ ते सव्वा लाखाने प्रवासी संख्येत घट झाल्याचे समोर आले. त्यातच लक्ष्मीपूजनानिमित घरोघरी उत्सव सुरू असल्याने महामेट्रोने मंगळवारी सायंकाळी सहानंतर मेट्रो सेवा बंद ठेवण्याचा निर्णय़ घेतला आहे.

फटाक्यांची ने-आण करण्यासही मज्जाव

दिवाळी सणानिमित्त फटाके, ज्वलनशील वस्तूंची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. मेट्रोने ज्वलनशील पदार्थांची वाहतूक (ने-आण) करण्यास मज्जाव आहे. त्यामुळे प्रवाशांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव नियमांचे पालन करावे. प्रवाशांच्या साहित्याची वेळोवेळी तपासणी करण्यात येणार असून ज्वलनशील पदार्थ आढळून आल्यास संबंधित प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याच्या सूचना महामेट्रोकडून करण्यात आल्या आहेत.

दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या सुटीमुळे सायंकाळनंतर मेट्रो प्रवासासाठी गर्दी कमी असते. त्यामुळे मंगळवारी दोन्ही मार्गिकांवरील मेट्रो सेवा सायंकाळी सहा वाजेनंतर बंद ठेवण्यात येणार आहे. बुधवारी नियमित वेळापत्रकानुसार मेट्रो रात्री ११ वाजेपर्यंत धावेल. – चंद्रशेखर तांबवेकर, अतिरिक्त महाव्यवस्थापक (जनसंपर्क आणि प्रशासन) महामेट्रो.