कसबा विधानसभा पोटनिवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढविण्याची अद्यापही अधिकृत घोषणा झालेली नाही.  शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील घटक पक्षांची संयुक्त बैठक झालेली नाही. त्यामुळे पोटनिवडणूक कोणता पक्षाचा उमेदवार असेल हे निश्चित न झाल्याने तिन्ही पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून वैयक्तिक पातळीवर तयारी सुरू झाल्याचे चित्र आहे. त्यातून एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुणे : महाविकास आघाडीत बिघाडी? राष्ट्रवादीकडून कसबा पोटनिवडणूक लढण्याचा ठराव; काँग्रेसवरही केले आरोप

पक्षाची बैठक, इच्छुक उमेदवारांच्या नावांची चर्चा, इच्छुकांच्या मुलाखती असे प्रकार महाविकास आघाडीत सुरू झाले आहेत. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढविली जाईल, अशी चर्चा तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असली तरी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तरी घोषणा न झाल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून भारतीय जनता पक्षाविरोधात निवडणूक लढतील, अशी चर्चा सुरू झाली. या तिन्ही पक्षांच्या शहर पातळीवरील तिन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून तसे सांगण्यात आले. मात्र महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढविण्याची आणि या मतदार संघातून भाजपला कोण आव्हान देणार याचा निर्णय अद्यापही झालेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून दावे-प्रतिदावे करत एकमेकांवर कुरघोडीचा प्रयत्न सुरू झाला आहे.

हेही वाचा >>> पुणे :‘कसब्या’साठी काँग्रेसकडून १६ इच्छुक; उमेदवारांच्या दूरचित्र संवाद पद्धतीने मुलाखती

महाविकास आघाडीची बैठक झाली नाही, हे सत्य आहे.  कसब्यावर शिवसेनेचाच अधिकृत हक्क आहे. त्यासंदर्भातील भूमिका आणि मतदार संघातील राजकीय समीकरणे वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचविण्यात आली आहेत.

संजय मोरे, शहराध्यक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

महाविकास आघाडी म्हणून बैठक झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. यासंदर्भात घटक पक्षांकडून काेणताही संपर्क करण्यात आलेला नाही. महाविकास आघाडीबाबत तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील.

प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maha vikas aghadi meeting date not yet confirm over candidate for kasba by election pune print news apk 13 zws
First published on: 31-01-2023 at 21:53 IST