पुणे : आंबट-गोड चवीच्या गुजबेरीचा हंगाम सुरू झाला आहे. महाबळेश्वरमधून मार्केट यार्डातील फळबाजारात गुजबेरीची आवक सुरू झाली आहे. घाऊक बाजारात महाबळेश्वरमधून दररोज १० ते १५ किलो गुजबेरीची आवक होत आहे.

‘आंबट-गोड चवीच्या गुजबेरीची लागवड महाबळेश्वर आणि नाशिक भागात केली जाते. गुजबेरी लागवडीस थंड हवामानाची आवश्यकता असते. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात गुजबेरीचा हंगाम सुरू होतो. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात महाबळेश्वर, वाई परिसरातील शेतकरी गुजबेरी विक्रीस पाठवितात. मार्केट यार्डातील फळबाजारात महाबळेश्वरमधील शेतकरी नीलेश पवार यांनी गुजबेरी विक्रीस पाठविली आहे. गुजबेरीला मागणी चांगली असून घाऊक बाजारात एक किलो गुजबेरीला प्रतवारीनुसार ३०० ते ५०० रुपये भाव मिळाला आहे,’ अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळ व्यापारी जेसाराम मनुमल यांनी दिली.

‘गुजबेरीचा हंगाम मे महिन्यापर्यंत सुरू राहतो. हंगामाचा दुसरा टप्पा डिसेंबर महिन्यात सुरू होतो. डिसेंबर महिन्यात गुजबेरीची आवक वाढते. डिसेंबरमध्ये साधारणपणे बाजारात दररोज १०० किलो गुजबेरीची आवक होते. महाबळेश्वर, नाशिक भागातील शेतकरी गुजबेरी विक्रीस पाठवितात. त्यानंतर गुजबेरीचे दर कमी होतात. आवक वाढल्यानंतर एक किलोचे भाव प्रतवारीनुसार ८० ते २५० रुपयांपर्यंत स्थिरावतात. मे महिन्यापर्यंत गुजबेरीची आवक सुरू राहते. पावसाळा सुरू झाल्यानंतर हंगामाचा शेवट होतो,’ असे त्यांनी नमूद केले.

गुजबेरी मधुमेहावर गुणकारी असल्याने मधुमेहींकडून गुजबेरीला मागणी असते. गुजबेरीला पुणे, मुंबईतील ग्राहकांकडून सर्वाधिक मागणी असते. – जेसाराम मनुमल, फळ व्यपाारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड