पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, तसेच सोलापूर या पाच जिल्ह्यांतील तब्बल ३४ हजार २८७ सराइतांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली. पोलिसांनी सराइतांकडून २३ पिस्तुले आणि ३६ काडतुसे जप्त केली. पोलिसांनी कारवाई करून १९ कोटी १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये रोकड, गावठी दारू, अमली पदार्थ, सोने-चांदी, गुटख्याचा समावेश आहे.

पोलिसांच्या कोल्हापूर परिक्षेत्रात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश होताे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांवर कारवाईचे आदेश दिला होता. त्यानुसार पाच जिल्ह्यांतील ३४ हजार २८७ सराइतांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांना नोटीस बजाविण्यात आली आहे. बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. सराइतांकडून २३ पिस्तुले आणि ३६ काडतुसे जप्त करण्यात आली. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दहा दखलपात्र, १५ अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी पाच जिल्ह्यांतील सराइतांवर करडी नजर ठेवली आहे. सराइतांची चौकशी करण्यात येत आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्री कोण, याचा अंदाज बांधणे अशक्य; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मत

३६ तपासणी नाके अहोरात्र

कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला लागून आहेत. निवडणूक काळात शेजारी कर्नाटकातून मद्य, अमली पदार्थ, तसेच बेकायदा वस्तू पाठविल्या जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कागल, शिवनाकवाडी, सांगली, म्हैसाल, कात्राळ येथे तपासणी नाके सुरू करण्यात आले आहेत. तेथे प्रादेशिक परिवहन विभागातील कर्मचारी, वस्तू आणि सेवा कर कार्यालय (जीएसटी), राज्य उत्पादन शुल्क, तसेच वन विभागातील अधिकाऱ्यांची पथके तैनात आहेत. अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी अमली पदार्थ हुडकून काढणारे श्वान तैनात करण्यात आले आहेत.

समाजमाध्यमावर नजर

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमातील मजकुरावर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. सायबर पोलिसांच्या पथकाला याबाबतचे काम सोपविण्यात आले आहे. समाजमाध्यमात बदनामीकारक, तसेच तेढ निर्माण करणारे संदेश प्रसारित केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा – ‘कसब्या’तील आमदारांची कामे कमी आणि दंगा जास्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. पाच जिल्ह्यांतील पोलिसांकडून निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. तपासणी नाके अहोरात्र सुरू ठेवण्यात येणार आहेत. प्रतिबंधात्मक कारवाईबरोबरच गुन्हेगारांची झाडाझडती (कोम्बिंग ऑपरेशन) घेण्यात येत आहे. – सुनील फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र