scorecardresearch

राज्यात तीन दिवस पुन्हा लाहीलाही ; विदर्भ, मराठवाडय़ासह सर्वत्र तापमानात आणखी वाढ

एकापाठोपाठ एक उष्णतेच्या लाटा येत असल्याने उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण झाले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

पुणे : उष्णतेच्या लाटा आणि उन्हाच्या चटक्यांनी राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून कहर केला असतानाच राज्यात पुढील तीन दिवस कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिमेकडील राज्यांतील तापमानात वाढ होणार असल्याने विदर्भात सोमवारपासून (१८ एप्रिल) तीन दिवस उष्णतेची लाट येणार असून, मराठवाडय़ाचा पाराही वाढणार आहे. उर्वरित महाराष्ट्रातही तापमानात काही प्रमाणात घट होणार असल्याचा अंदाज आहे. २१ एप्रिलनंतर मात्र तापमानात काही प्रमाणात घट होऊन राज्यात पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

मार्चपाठोपाठ एप्रिलमध्येही तापमानाचा पारा उच्चांकी पातळीवर पोहोचत आहे. एकापाठोपाठ एक उष्णतेच्या लाटा येत असल्याने उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. पिकांवरही त्याचा परिणाम होत आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडय़ात त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रात काही भागात तापमानाचा पारा चढाच आहे. गेल्या तीन दिवसांत तापमानात किंचित घट दिसून येत होती. मात्र, पारा पुन्हा वाढू लागला आहे. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत उत्तर-पश्चिम भागासह मध्य भारतात कमाल तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिसा, झारखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली आदी भागांत २० एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटा कायम राहणार आहेत.

उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भातही १८ ते २० एप्रिल या कालावधीत काही भागात उष्णतेची लाट असणार आहे. मराठवाडय़ातही उन्हाचा पारा चांगलाच वाढणार आहे. कोरडय़ा हवामानाची स्थिती आणि उष्ण वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे राज्यातील बहुतांश भागात पुढील तीन दिवसांत कमाल तापमान ४० अंशांपुढे राहण्याची शक्यता आहे. २१ एप्रिलनंतर मात्र राज्यात तुरळक भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होईल. या काळात तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.

चंद्रपूर, ब्रह्मपुरी देशात सर्वात उष्ण

विदर्भात सध्या उन्हाचा चटका सर्वाधिक असून, सर्वत्र तापमान ४२ ते ४४ अंशांदरम्यान आहे. रविवारी चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी येथे प्रत्येकी ४४.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. शनिवारी चंद्रपूर येथील तापमान देशातील उच्चांकी तापमान ठरले, तर सर्वात उष्ण जागतिक शहरांच्या यादीतही चंद्रपूर पोहोचले. अकोल्याचे ४३ अंशांपुढे तापमान आहे. उष्णतेच्या लाटेमध्ये तापमानात आणखी काही प्रमाणात वाढ होऊ शकते. मराठवाडय़ात तापमानाचा पारा सध्या ४० ते ४१ अंश असून, तो ४२ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, सोलापूर, पुणे आदी भागांत ४० अंशांच्या आसपास तापमान आहे. या विभागात इतर भागातही तापमान वाढणार आहे. मुंबईसह कोकण विभागात सध्या कमाल तापमान सरासरीच्या आसपास नोंदविले जात आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maximum temperature is likely to rise in the next three days in maharashtra zws