पुणे : ‘बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या नियोजनाची सुरुवात एप्रिल-मे महिन्यापासूनच झाली होती. पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या ‘सातपुडा’ या सरकारी बंगल्यावर एक बैठक झाली होती. त्यातील ५० लाख रुपयांची रक्कम निवडणुकीपूर्वीच देण्यात आली,’ असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी येथे रविवारी केला.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील आंबेडकरी चळवळीशी संबंधित युवक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर या दोघांना न्याय मिळावा, यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ऐतिहासिक लाल महाल येथून या मोर्चाला सुरुवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचा समारोप झाला. त्या वेळी बोलताना आमदार धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला.

हेही वाचा >>>कचरामुक्त पिंपरी-चिंचवडसाठी पुढाकार; आठ क्षेत्रीय कार्यालयांतील ८० ठिकाणांवर लक्ष

‘धनंजय मुंडे काही ब्रह्मदेव नाहीत. नैतिकता आणि मुंडे यांचा काही संबंध नाही. खंडणीसंदर्भातील बैठकीचे आरोप चुकीचे असतील तर, राजकारण सोडून देईन,’ असे सांगतानाच धस यांनी महाराष्ट्र अजित पवार यांच्याकडे एका चांगला नेता म्हणून पाहत आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही केली.

कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करावा’

संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी वाल्मीक कराड याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा आणि दोषींना फाशीची शिक्षा द्यावी. शिक्षा होत नाही, तोपर्यंत धनंजड मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी,’ अशी मागणी जनआक्रोश मोर्चामध्ये करण्यात आली.

हेही वाचा >>>खराडीतील सोसायटीत दूषित पाण्याचापुरवठा करणारा टँकर व्यावसायिक अटकेत, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील पाण्याचा पुरवठा केल्याचे उघड

सर्वपक्षीय मोर्चाला युतीआघाडीचे आमदार अनुपस्थित

जनआक्रोश मोर्चाला पुणे शहरातील आमदारांनी पाठ फिरवली. त्यावरून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी खोचक टिप्पणी केली. ‘रविवारची सुट्टी असल्याने ते मोर्चात सहभागी झाले नसावेत’ असे त्यांनी सांगितले. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय, मुलगी वैभवी, बीडचे खासदार बजरंग सोनावणे, शिवसंग्राम संघटनेच्या अध्यक्ष ज्योती मेटे, पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप, शिवसेनेचे (ठाकरे) शहर प्रमुख संजय मोरे या वेळी उपस्थित होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित राहून मोर्चाला पाठिंबा दिला.

राज्यात येणाऱ्या गुंतवणूकदारांकडे खंडणी मागितली जात असेल, तर कोणीही राज्यात येणार नाही. मुख्यमंत्र्यांनी अशा गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे उच्चपदस्थांचे राजीनामे त्वरित घेऊन कडक कारवाई व्हावी.पृथ्वीराज चव्हाणकाँग्रेस नेते

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे हात जोडून विनंती आहे. त्यांनी मुंडे यांचा राजीनामा घ्यावा. बीडचा बिहार नाही, तर हमास-तालिबान झाला आहे. कराड यांच्या बँक व्यवहाराची चौकशी झाली पाहिजे.- सुरेश धस, आमदार