३० सप्टेंबर १९९३ ची पहाट. किल्लारीच्या भूकंपाने आजूबाजूच्या ५२ गावांतील हजारो संसार उघड्यावर आले. या घटनेला ३२ वर्षे पूर्ण होत आहेत. भूकंपाने एक पिढी उद्ध्वस्त केली. ढिगाऱ्यांत अडकलेले मृतदेह, जखमी लोक, नातेवाइकांना शोधणारे ग्रामस्थ, मदतकार्य करणारे स्वयंसेवक, कोलमडलेले संसार पाहून दुसरी पिढी उद्ध्वस्त होऊ नये म्हणून झटणारे शांतिलाल मुथा यांच्याबरोबर तुषार सूर्यवंशी यांनी साधलेला संवाद…
तुमच्या किल्लारीच्या भूकंपाच्या आठवणी काय आहेत?
किल्लारीत भूकंपाची बातमी सकाळी रेडिओवरून मिळाली. त्यानंतर लगेचच भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) कार्यकर्त्यांना घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या. या भूकंपाच्या घटनेपूर्वी सात-आठ वर्षे मी सामाजिक कार्याकडे वळलो होतो. राज्यभर पायी प्रवास केला होता. समाजातील कौटुंबिक प्रश्न, घटस्फोट, विधवाविवाह, स्त्रीभ्रूणहत्या यांसारख्या प्रश्नांवर ‘बीजेएस’च्या माध्यमातून कामास सुरुवात केली होती. त्यामुळे लातूर-धाराशिव परिसरातही संघटनेच्या कार्यकर्त्यांचे चांगले जाळे निर्माण झाले होते. त्यांच्या माध्यमातून तातडीने मदतकार्याची सुरुवात करता आली. प्रत्यक्ष तेथे पोहचलो, तेव्हा तेथील परिस्थिती अत्यंत विदारक होती. गावे बेचिराख झालेली, माणसे ढिगाऱ्याखाली दबलेली. पोलीस, प्रशासन आणि लष्कराचे अधिकारी मदतकार्य करत होते. मात्र, चादरीवर मृतदेह नेण्याइतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत सास्तूर गावात मदत केंद्र सुरू केले. तेथे पिण्याचे पाणी, जेवण, कपडे याबरोबरच वैद्यकीय मदत देण्यात येत होती. मात्र, अनेक प्रश्न अनुत्तरित होते. अनेक आव्हाने नव्याने समोर येत होती.
भूकंपानंतरच्या परिस्थितीत कोणती आव्हाने होती? ती कशा प्रकारे हाताळलीत?
किल्लारीच्या भूकंपाने गावे जमीनदोस्त केली. अधिक तीव्र परिणाम अनाथ झालेल्या लहान मुलांवर झाला. त्यांच्या काळजाला भरून न येणाऱ्या जखमा झाल्या. ही मुले मदतीच्या प्रत्येक गाडीजवळ मोठ्या आशेने जात होती. त्यांच्या समोर विदारक दृश्य होते. ढिगाऱ्यांत अडकलेल्या आपल्या माणसांचे मृतदेह, जखमी, हात-पाय आणि कणा मोडलेली माणसे, नातेवाइकांना शोधणारे ग्रामस्थ, मदत काम करणारे स्वयंसेवक, पोलीस-जवान, असे भीतिदायक चित्र या मुलांसमोर होते. त्यांच्या शिक्षणाचा, भविष्याचा मोठा प्रश्न उभा राहिला होता. या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा करून शासनाच्या परवानगीने भूकंपग्रस्त ५५ गावांतील १२०० मुलांना दत्तक घेतले. या मुलांना २१ ऑक्टोबरला (त्या दिवशी दसरा होता) एकत्र करून पुण्याच्या दिशेने एका नव्या प्रवासाची सुरुवात केली. त्यांच्या शिक्षणासाठी ‘शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प’ उभा केला.
भूकंपाने एक पिढी उद्ध्वस्त झालेल्यांची दुसरी पिढी उद्ध्वस्त होऊ नये, म्हणून हा प्रकल्प सुरू केला. त्यात मुलांच्या शिक्षणाची कायमस्वरूपी सोय केली. भूकंप, पूर-महापुरासारख्या आपत्ती केवळ गाव, समाज उद्ध्वस्त करून थांबत नाहीत. माणसांचे पडलेले मृतदेह आणि दगड-विटांच्या भिंती जास्त त्रासदायक नसतात. त्यापेक्षाही अधिक वेदनादायी असतात, गाडली गेलेली लहानग्यांची स्वप्ने आणि तरुणांची ढासळलेली उमेद. त्यामुळे संस्थेने कामाचा विस्तार केला. प्रत्येक आपत्तीनंतर तिथल्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मेळघाटातील आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी मदतीच्या पलीकडे जात संस्थेच्या माध्यमातून काम केले जाते. जबलपूर भूकंपात अनाथ झालेली मुले, २००५ मध्ये जम्मू-काश्मीरच्या भूकंपातील ५०० मुस्लिम मुले, १९९७ पासून ठाणे, तसेच मेळघाटातील आदिवासी मुले, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची ६०० मुले-मुली, शिवाय कोव्हिड-१९ संकटकाळात अनाथ झालेल्या मुला-मुलींना ‘वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पा’ने मायेचा मोठा आधार दिला.
संस्थेचे काम गेल्या ३२ वर्षांपासून सुरू आहे. हे काम करताना कोणती गोष्ट प्रेरित करते?
किल्लारीच्या भूकंपावेळी मनात आलेला मुलांच्या शिक्षणाचा, भवितव्याचा विचार आजही कायम आहे. त्याच भावनेतून काम सुरू आहे. आता कामाचा विस्तार झाला आहे. गेल्या ३२ वर्षांत आपत्ती हाताळण्याचा मोठा अनुभव मिळाला. प्रत्येक वेळी मदतीपलीकडे माणसांना सावरण्याचा, पिढ्या उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्याचाच विचार डोक्यात असतो. लोकांना खाऊ-पिऊ घालणे, फक्त शिक्षण देणे हेच काम नसते. त्यांना आपत्तीतून बाहेर काढून सावरण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी लागते. आता संस्थेमध्ये शिक्षणासाठी दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना सावरून, त्यांना सक्षम करून बदलाचे दूत घडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. हे विद्यार्थी समाजात सकारात्मक बदलासाठी काम करतील, या विश्वासाने काम सुरू आहे.