आगामी महापालिका निवडणुकीसाठी चार नगरसेवकांचा एक प्रभाग करण्याच्या निर्णयावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी शिंदे-फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. राजकारणाची चीड यायला लागली आहे. हिंमत असेल तर निवडमुकांना सामोरे जा. प्रत्येकजण सोईने प्रभाग रचना बदलतो आहे. मात्र कितीही तोडा, जोडा आम्ही लढायला तयार असून आगामी महापौर मनसेचा होईल, असा दावा वसंत मोरे यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हिंमत असेल तर महापौरांची निवडही जनतेतून करावी, असे आव्हानही त्यांनी दिले.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रभाग पद्धत (तीन नगरसेवकांचा एक प्रभाग) रद्द करून चार नगरसेवकांचा एक प्रभाग या पद्धतीने निवडणूक होणार आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतल्याने ही बाब स्पष्ट झाली असून निवडणुकीसाठी पुन्हा आरक्षण, प्रभाग रचना अशी प्रक्रिया राबवावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी सरकारच्या या निर्णायवर कडाडून टीका केली.
शिंदे-फडणवीस सरकारने आधीच्या सरकारचे अनेक निर्णय बदलले मात्र प्रभाग रचना बदलण्याचे कारण काय, अशी विचारणा मोरे यांनी केली. सन २०१७ मध्ये भाजपच्या फायद्याची प्रभाग रचना झाली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या फायद्याची प्रभाग रचना केली. जनतेच्या प्रश्नाकडे कोणाचे लक्ष नाही. त्यासाठी राजकारण्यांना वेळ नाही. राजकारणाची चीड यायला लागली आहे. प्रत्येकाने आपापल्या सोईने प्रभाग रचना बदलली तरी कात्रज मनसेचा बालेकिल्ला राहील. आगामी निवडणुकीनंतर महापौर मनसेचा असेल, असे वसंत मोरे यांनी सांगितले.