मंगेशकर रुग्णालयात अणुवैद्यक, क्ष-किरण केंद्राचे उद्घाटन
आपल्या देशातील शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा सर्व स्तरातील नागरिकांसाठी सुलभ असल्या पाहिजेत. प्रत्यक्षात मात्र त्या सर्वासाठी, सर्वत्र दुर्लभ असल्याचेच पाहायला मिळते, अशी खंत रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी व्यक्त केली.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील पुसाळकर अणुवैद्यक आणि क्ष-किरण केंद्राचे उद्घाटन भागवत यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. रुग्णालयाचे कार्यकारी विश्वस्त पंडित हृदयनाथ मंगेशकर, भारती मंगेशकर, विश्वस्त आदिनाथ मंगेशकर, वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर, ज्यांच्या आर्थिक देणगीतून हे केंद्र सुरू झाले, ते विजय आणि तनुजा पुसाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
भागवत म्हणाले, आजारांवर इलाज करताना आजार होऊ नयेत यासाठीच्या इलाजांचा विचार होण्याची गरज आहे. वैद्यकीय उपचारांमध्ये विविध उपचारपद्धतींच्या तटबंदी उभ्या राहिल्या आहेत. परंतु प्रत्येक उपचारपद्धती काही ना काही चांगले आहे हे समजून घेण्याची गरज आहे. सर्व प्रकारच्या उपलब्ध वैद्यकीय सुविधा खेडय़ा-पाडय़ांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे.
समाजाने मला भरपूर दिले, त्यातून उतराई होण्याचा एक लहान प्रयत्न म्हणून आरोग्य क्षेत्रात काम करावेसे वाटल्याची भावना या वेळी विजय पुसाळकर यांनी व्यक्त केली. त्यांनी दिलेल्या देणगीतून उभ्या राहिलेल्या अणुवैद्यक आणि क्ष-किरण केंद्रामध्ये अत्याधुनिक उपकरणांचा समावेश करण्यात आला आहे. त्याच्या साहाय्याने डिजिटल मॅमोग्राफी, डेक्सा स्कॅन सारख्या वैद्यकीय चिकित्सापद्धती रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहेत. डॉ. केळकर म्हणाले, कोणीही रुग्ण विन्मुख जाता कामा नये हे आमचे ध्येय असून पुसाळकरांसारख्या दानशूर व्यक्तींमुळेच ते पूर्ण करणे शक्य होते.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी पाठवलेली गणेश मूर्ती देऊन रुग्णालयाचे कार्यकारी विश्वस्त पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी भागवत यांचे स्वागत केले. आदिनाथ मंगेशकर यांनी आभार मानले.
( दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील ‘पुसाळकर अणुवैद्यक आणि क्ष-किरण केंद्रा’चे उद्घाटन गुरुवारी रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. पं. हृदयनाथ मंगेशकर, विजय पुसाळकर, डॉ. धनंजय केळकर यावेळी उपस्थित होते. ))