पुणे : ‘पुरोगामीत्व मिरवणाऱ्या महाराष्ट्रात ज्येष्ठांकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष वेदनादायी आहे,’ अशी खंत खासदार मेधा कुलकर्णी यांनी मंगळवारी व्यक्त केली. कुटुंबात सौहार्दपूर्ण वातावरण करण्यासाठी एकत्र कुटुंब पद्धतीचे पुनरूज्जीवन करणे आवश्यक आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य, जनसेवा फाउंडेशन, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघ पुणे (फेस्कॉम), मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघ पुणे (ॲस्कॉप), भारतीय योग संस्थान, नवचैतन्य हास्ययोग परिवार, एकता योग ट्रस्ट, हेल्पेज इंडिया, एल्डर लाईन १४५६७ आणि कोथरूड परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक संघांच्या संयुक्त विद्यमाने आज आयोजित जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जनजागृती दिन समारंभात मेधा कुलकर्णी बोलत होत्या.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, जनसेवाचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा, सचिव मीना शहा, माजी आमदार मोहन जोशी, गणेश मरकड, अरुण रोडे, दिलीप पवार, मधुकर पवार, नंदकुमार राणे आणि स्मितेश शहा या वेळी उपस्थित होते.ज्येष्ठांचा आदर सन्मान राखून त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ होणार नाही, याची वैयक्तिक आणि सार्वजनिक पातळीवर देखील काळजी घेण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.पवार म्हणाले, ‘ज्येष्ठ नागरिक ही आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे. अनुभव संपन्नता ही त्यांच्याकडची महत्त्वाची शिदोरी असून, त्यांच्या अनुभवातून नवीन पिढीने सक्षम होणे आवश्यक आहे.’