पुणे : राज्यात गेल्या चार महिन्यांपासून पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. केंद्र आणि राज्य सरकारने या परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी देत ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

पुणे महापालिकेत येत असलेल्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या वारजे, कात्रज, चांदणी चौक, धायरी या भागातील उड्डाणपूल तसेच नागरिकांना भेडसावणारे प्रश्न जाणून घेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी या भागात पाहणी केली. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या पाहणी दौऱ्यात खासदार सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ओला दुष्काळ जाहीर करण्याबरोबरच निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना देण्यात आलेला कर्जमाफीचा शब्द पाळावा, अशी मागणी सुळे यांनी केली.

सुळे म्हणाल्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडेच सहकार मंत्रालयाची जबाबदारी आहे. गेल्या महिन्यांत त्यांची भेट घेतली. त्यावेळी गेल्या चार महिन्यांपासून राज्यात सतत पाऊस पडत आहे. राज्यातील काही भागात ढगफुटी सदृश्य पडलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यातील शेतऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी महाविकास आघाडी सरकराची मागणी आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यासह दोन्ही विद्यमान उपमुख्यमंत्र्यांनी निवडून आल्यानंतर कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती. दिलेला शब्द राज्यात सत्ताधारी असलेल्या महायुती सरकारने सरसकट कर्जमाफी देऊन पाळावा आणि ओला दुष्काळ जाहीर करावा, असे खासदार सुळे म्हणाले.

‘सत्तेचे विकेंद्रीकरण राज्यकर्त्यांना मान्य नाही’

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिन्यांनी पुढे जात असल्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या,‘पंचायतराज हा गाभा आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. मात्र, या सर्व गोष्टी सत्ताधाऱ्यांना मोडीत काढायच्या आहेत. त्यामुळेच निवडणूक पुढे ढकलली जात आहे.’

‘राज्यात महायुतीचे सरकार आहे. ते व्यवस्थित काम करत आहे ना? मग असे का घडत आहे,’ असा सवाल खासदार सुळे यांनी केला.

हिंडवडीतील वाहतूक कोंडी न सुटणे हे दुदैव

‘शहराचा विकास ज्या पद्धतीने होणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे होत नाही. शहरात वाहतुकीचा प्रश्न अत्यंत गंभाीर होत चालला आहे. हिंजवडी येथील आयटी पार्क परिसरातील प्रश्नासाठी दर पंधरा दिवसांनी बैठक घेतली जाते. मात्र त्यानंतरही प्रश्न सुटत नाही. प्रशासनाने जे निर्णय घेतले पाहिजे, ते घेतले जात नाहीत. येथील वाहतूक कोंडी सुटत नाही, रस्त्यांची अवस्था बिकट आहे. हे राज्य सरकारचे अपयश आहे. नगर नियोजनामध्ये विस्कळतीपणा आला आहे. याकडे राज्यकर्ते गांर्भीयाने पाहत नाहीत,’ असेही खासदार सुळे म्हणाल्या.

‘फक्त ‘त्यांनीच’ पंतप्रधान मोदींना नेता मानले’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या जाहिरातींमध्ये केवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. यावर बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, ‘यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की, फक्त उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांना नेता मानले आहे. बाकीचे कोणी त्यांचे छायाचित्र लावत नाहीत, याची नोंद घेतली पाहिजे.’

‘काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिरात सर्वत्र देण्यात आली होती. ही जाहिरात नक्की कोणी दिली, याचा संदर्भ लागत नाही.’ असेही खासदार सुळे म्हणाल्या.