राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) पुणे जिल्ह्याअंतर्गत ४० मार्गांवर बससेवा सुरु करण्यात आली आहे. या सेवेला नुकतीच सुरुवात झाली असून याला प्रवाशांचा समाधानकारक प्रतिसाद नसल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पण येत्या काळात करोनाच्या निर्बंधासह प्रवाशांच्या संख्येत वाढ होईल, अशी एसटी प्रशासनाला आशा आहे. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

नेहमीच्याच दरात ही एसटीची सेवा सुरु करण्यात आली असून या प्रवासासाठी सध्या पोलिसांकडून घ्याव्या लागणाऱ्या कुठल्याही ई-पासची आवश्यकता नाही, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. “आम्ही पुणे जिल्हांतर्गत एसटी सुरु केली असून सध्या ५५ बसेस रस्त्यांवर धावत आहेत. सरकारनं फिजिकल डिस्टंसिंगच्या घालून दिलेल्या नियमांप्रमाणे प्रत्येक बसमध्ये तिच्या क्षमतेपेक्षा निम्म्याच प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. यांपैकी १० ते १२ एसटी गाड्या या वाकडेवाडी आणि स्वारगेट बस डेपोमधून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सोडण्यात येत आहेत. तर इतर बससेवा या तालुक्यांच्या मुख्यालयांना जोडणाऱ्या असणार आहेत,” अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली.

पुणे जिल्ह्यात ‘या’ मर्गांवर धावताहेत बस

सध्या या एसटी गाड्या पुण्याहून बारामती, भोर, शिरुर, सासवड, नारायणगाव, राजगुरुनगर, इंदापूर, दौंड, पाटस, नीरा, जुन्नर, आळेफाटा, भीमाशंकर, वेल्हा, पौड, मुळशी तसेच बारामती-भिगवण, बारामती-वालचंदनगर, बारामती-दौंड, स्वारगेट-वेल्हा, तळेगाव-चाकण-शिक्रापूर, नारायणगाव-जुन्नर आणि जुन्न-देवळे या मार्गावर सुरु करण्यात आल्या आहेत.

तसेच या व्यतिरिक्त ज्या गाड्या सध्या विविध डेपोंमध्ये पार्क करुन ठेवण्यात आल्या आहेत त्या गाड्यांसह ड्रायव्हर्स आणि कंडक्टर्सना फिरत्या पद्धतीने कामावर बोलावले जाणार आहे. राज्य शासनाने आंतरजिल्हा वाहतुकीला परवानगी दिली आहे. या आंतरजिल्हा प्रवासासाठी सध्या ई-पास घ्यावा लागतो. याची जबाबदारी राज्यभरातील पोलीस खात्यावर सोपवण्यात आली आहे.

लॉकडाउनच्या काळात एसटी महामंडळाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. राज्याच्या परिवहन विभागाने या संकटाला तोंड देण्यासाठी केंद्राकडे एक हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत मागितली होती.