पुणे : पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांना दोन दिवसांपूर्वी मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. लोहगाव येथील एका कार्यक्रमा निमित्त आमदार पठारे गेलेले असताना अचानक काही जणांनी त्यांना धक्काबुक्की करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून वडगावशेरी मतदारसंघातून बापूसाहेब पठारे यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत ते विजयी झाले. पुणे शहरातून महाविकास आघाडीच्या तिकिटावर विजयी झालेले ते एकमेव उमेदवार आहेत. दोन दिवसांपूर्वी आमदार पठारे लोहगावात एका माजी सैनिकाच्या सेवापूर्तीनिमित आयोजित कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये आमदार पठारे यांना किरकोळ स्वरूपात दुखापत देखील झाल्याचे सांगण्यात येत होते.
हा हल्ला पूर्वनियोजित होता. कट रचून मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आमदार बापूसाहेब पठारे यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे बंडू खांदवे यांनी कट रचून माझ्यावर हल्ला केला. लोहगाव येथे एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. त्यावेळी अचानक माझ्यासोबत वाद घालण्यास सुरुवात झाली. त्यानंतर थेट अंगावर धावून आले. तसेच माझ्या अंगरक्षकाला आणि चालकाला मारहाण करण्यात आली, असे आमदार पठारे यांनी खराडी येथे पत्रकार परिषद घेऊन सांगितले. माजी नगरसेवक महेंद्र पठारे, भैयासाहेब जाधव, सुरेंद्र पठारे यावेळी उपस्थित होते.
आमदार पठारे म्हणाले की, ज्या प्रश्नांबाबत आंदोलन ठेवले आहे, ती कामे होणार आहेत. असे सांगितल्यानंतर बंडू खांदवे याने वाद घालण्यास सुरुवात केली. मी आंदोलन ठेवलं तुम्ही का विरोध करता? असे म्हणत मला त्याने मारण्याचा प्रयत्न केला. माझा अंगरक्षक, चालक याला बेदम मारहाण करण्यात आली. दोन मिनिटातच तेथे खांदवे यांचे साथीदार आले. त्यांनी ही मारहाण केली.१०० हून अधिक लोक जमा केले होते. त्याने हा प्रकार ठरवूनच केला आहे.
या प्रकाराबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते अजित पवार यांची भेट घेणार आहे. त्यांना म्हणणार आहे, ‘ शोभते का त्यांना माझ्यावर असा हल्ला करायला ‘ असेही आमदार पठारे यांनी स्पष्ट केले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा हल्ला केला. वेगळं वातावरण तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आमदार बापूसाहेब पठारे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. ही घटना निषेधार्ह आहे. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींवर हल्ला करतात हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण नाही. आम्ही सर्वजण या घटनेचा कठोर शब्दांत निषेध करतो. आमदार पठारे यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी देखील या राज्यात सुरक्षित नाहीत ही मोठी चिंताजनक आणि गृहखात्यासाठी नामुष्कीची बाब आहे, असे खासदार सुळे यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे. आमदार रोहित पवार यांनी देखील या घटनेचा निषेध करत राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
