विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार महाविद्यालयांनी मूल्यांकन करणे आवश्यक आहे. मात्र, शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी नावाजलेल्या पुणे विद्यापीठातील निम्म्या महाविद्यालयांनीही मूल्यांकन करून घेतलेले नाही. मूल्यांकन केलेल्या महाविद्यालयांमध्येही पुनर्मूल्यांकन करून घेण्यामध्ये महाविद्यालये मागेच आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार नॅशनल अॅक्रेडेशन अँड असेसमेंट काऊन्सिलकडून (नॅक) किंवा नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिएशनकडून (एनबीए) महाविद्यालयांनी मूल्यांकन करून घेणे आवश्यक आहे. महाविद्यालयाची गुणवत्ता, पायाभूत सुविधा अशा गोष्टींच्या आधारे महाविद्यालयांचे मूल्यांकन केले जाते. दर पाच वर्षांनी महाविद्यालयांनी मूल्यांकन करून घेणे अपेक्षित आहे. देशातील सर्व महाविद्यालयांनी २०१५ चे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी मूल्यांकन करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मूल्यांकनाचे अर्ज करण्यासाठी जून २०१४ अंतिम मुदत देण्यात आली आहे. मूल्यांकन करून न घेणाऱ्या महाविद्यालयांचे आणि विद्यापीठाचे अनुदान न देण्याची तंबीही आयोगाने सध्या दिली आहे.
प्रत्यक्षात शैक्षणिक गुणवत्तेसाठी आपली पाठ थोपटून घेणाऱ्या पुणे विद्यापीठातील महाविद्यालये मूल्यांकन करून घेण्यामध्ये मागे आहेत. नगर, नाशिक, पुणे जिल्ह्य़ामध्ये कला, विज्ञान, वाणिज्य आणि विधी, शिक्षणशास्त्र या विद्याशाखांची पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेली ४७५ महाविद्यालये आहेत. त्यापैकी आतापर्यंत फक्त १५८ महाविद्यालयांनीच मूल्यांकन करून घेतलेले आहे. मूल्यांकन केलेल्या महाविद्यालयांमध्येही साधारण ५६ महाविद्यालयांची मूल्यांकनाची मुदत संपलेली आहे. बहुतेक महाविद्यालयांची मुदत २००८ किंवा २००९ मध्येच संपली आहे. मात्र, मुदत संपून काही वर्षे झाली तरी महाविद्यालयांनी पुनर्मूल्यांकन करून घेतलेले नाही. पाच ते सहा महाविद्यालयांची मूल्यांकनाची मुदत या वर्षांअखेरीपर्यंत संपत आहे.

‘‘काही महाविद्यालये नवीन आहेत. त्यांना कायमस्वरूपी संलग्नता नाही, त्यामुळे त्यांचे मूल्यांकन होऊ शकत नाही. सध्या ५२ महाविद्यालयांचे मूल्यांकन आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज पाठवण्यात आले आहेत. सर्व महाविद्यालयांचे मूल्यांकन होईल यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न केले जात आहेत.’’
– डॉ. व्ही. बी. गायकवाड, संचालक, महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळ
 
‘‘काही महाविद्यालये नवीन आहेत. त्यांना कायमस्वरूपी संलग्नता नाही, त्यामुळे त्यांचे मूल्यांकन होऊ शकत नाही. सध्या ५२ महाविद्यालयांचे मूल्यांकन आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज पाठवण्यात आले आहेत. सर्व महाविद्यालयांचे मूल्यांकन होईल यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न केले जात आहेत.’’
– डॉ. व्हि. बी. गायकवाड, संचालक, महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळ