महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे- मुंबई द्रुतगती मार्गाने मोटारीतून पुण्यात दाखल होत असताना उर्से टोलनाक्यावरील वसुली बंद ठेवण्यात आली होती. सुमारे वीस मिनिटे टोलची वसुली बंद ठेवण्यात आल्याने राज यांच्या ताफ्यासह सुमारे पाचशे वाहनांना टोल न भरताच पुढे सोडण्यात आले. मनसेच्या ‘टोल’ फोडच्या पाश्र्वभूमीवर कोणताही संघर्ष टाळण्याच्या दृष्टीने ‘आयआरबी’ कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
टोलविरोधी धोरण घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज्यात विविध भागातील टोलनाक्यांची तोडफोड केली. या पाश्र्वभूमीवर राज हे गुरुवारी पुण्यात दाखल झाले. द्रुतगती मार्गाने ते मोटारीने पुण्यात येणार असल्याने द्रुतगती मार्गावरील टोलनाक्यांवर विशेष दक्षता घेण्यात येत होती. राज यांचा ताफा उर्से टोलनाक्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी पंधरा मिनिटे अगोदर या टोलनाक्यावरील वसुली बंद करण्यात आली होती. त्यामुळे अनेक वाहनांना या कालावधीत टोलमुक्तीचा अनुभव मिळाला. राज यांच्या मोटारींचा ताफा सकाळी साडेअकराच्या सुमारास टोलनाक्यावरून पुढे गेल्यानंतरही पाच मिनिटे वसुली बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर तातडीने पुन्हा टोलची वसुली सुरू करण्यात आली.
राज यांच्या मोटारीच्या ताफ्याने संपूर्ण प्रवासादरम्यान कोठेही टोल भरला नाही. मनसेचे आंदोलन ताजे असताना टोल आकारणीवरून कोणताही संघर्ष होऊ नये, या उद्देशाने कंपनीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रवासादरम्यान टोल वसुली बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.