बाळंतपणात होणारे मातामृत्यू टाळण्यासाठी ‘फॉग्सी’ (द फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकोलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया) या संस्थेतर्फे परिचारिकांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. अतिरिक्त रक्तस्राव हे मातामृत्यूचे सर्वात मोठे कारण असून तो कसा थांबवता येईल याबद्दल प्रशिक्षित परिचारिकांनाही योग्य माहिती नसल्याची बाब संस्थेच्या निरीक्षणांमधून निदर्शनास आल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्ष डॉ. हेमा दिवाकर यांनी दिली.
सरकारतर्फे परिचारिकांना ‘स्किल बर्थ अटेंडंट’चे प्रशिक्षण पुरवले जाते. परंतु पंधरा दिवसांच्या प्रशिक्षणात अनेक गोष्टींचा मारा आणि ज्ञानाचे प्रत्यक्ष उपयोजन करण्याच्या संधीचा अभाव यामुळेच ही परिस्थिती उद्भवत असल्याचे दिवाकर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘देशात दरवर्षी सुमारे २ कोटी ७० लाख बाळंतपणे होतात. मध्यम व लहान शहरे तसेच ग्रामीण भागात रुग्णालयात आलेल्या स्त्रीचे बाळंतपण करण्याची जबाबदारी परिचारिका, प्रशिक्षित सुईणी आणि स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांवर पडते. संस्थेच्या प्रकल्पाअंतर्गत देशभरातील रुग्णालयांना भेटी दिल्या असता मातामृत्यू टाळण्यासाठी प्रत्यक्ष काय कृती करावी याची योग्य माहितीच परिचारिकांना नसल्याचे लक्षात आले. या प्रकल्पाअंतर्गत परिचारिकांना केवळ आवश्यक तेवढय़ाच गोष्टी सरावाच्या संधीसह शिकवण्यात येत आहेत. दर तीन महिन्यांनी शिकवलेले मुद्दे त्यांच्या कितपत लक्षात राहिले आहेत याचा आढावाही घेण्यात येत आहे. आतापर्यंत देशात दहा हजार परिचारिकांना संस्थेने प्रशिक्षण दिले आहे.’’
महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्ष अनुराधा आठवले म्हणाल्या, ‘‘महिलेचे बाळंतपण करणे हे अनुभवाचेच काम आहे. सरकारी रुग्णालयांत परिचारिकांना बाळंतपणे करण्याची संधी चांगली मिळते. मात्र खासगी रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या परिचारिकांना ही संधीच मिळत नाही.’’
स्किल बर्थ अटेंडंटच्या प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थीना प्रत्यक्ष अनुभव दिला जातो परंतु काही अद्ययावत गोष्टी परिचारिकांना पुन्हा सांगणे आवश्यक असते, असे भारती विद्यापीठ नर्सिग महाविद्यालयाच्या प्राचार्य स्नेहा पित्रे यांनी सांगितले.