supriya-shilamkarपुण्यातील तानाजी मालुसरे रस्त्यावर (सिंहगड रस्ता) सोमवारी सकाळी मोटारसायकलवरून जाणाऱया एका तरुणीचा विचित्र अपघातात मृत्यू झाला. मोटारसायकल घसरून झालेल्या या अपघातात तरुणीच्या डोक्याला जबर दुखापत झाली. विशेष म्हणजे, हेल्मेट घातलेले असतानाही अपघातानंतर तरुणीचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर खूप वेळाने घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल होऊन त्यानंतर संबंधित मुलीला रुग्णालयात नेण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातामुळे सिंहगड रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. सुप्रिया सोपान शिळमकर असे मृत पावलेल्या तरुणीचे नाव आहे.
सिंहगड रस्त्यावरील हिंगणेखुर्द परिसरात सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला. सिंहगड रस्त्यावर कायमच वाहतुकीचे प्रमाण जास्त असते. दांडेकर पूल ते धायरी फाटा या दरम्यान दोन्ही बाजूंनी दुचाकी, तीनचाकी, चारचाकी आणि सार्वजनिक वाहतुकीच्या बसेस यांच्यामुळे जागोजागी वाहतुकीची कोंडी झालेली पाहायला मिळते. या रस्त्यावरील चौकांमध्ये वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांचे प्रमाणही कमी असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
दरम्यान, पीएमपीएमएलच्या बसने धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे सुरूवातीला सांगण्यात आले. मात्र, अपघात झाला त्या ठिकाणापासून पीएमपीएमएलची बस अंदाजे पंधरा फूटांवर होती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.