पुणे : कात्रज बोगदा ते नवले पूल परिसरात दरवर्षी दहा भीषण अपघात होत होते. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय) योजलेल्या उपायांमुळे आता वर्षाला तीन भीषण अपघात होतात. मात्र, गेल्या आठवड्यात रविवारी झालेला अपघात भीषण होता. त्यावर दीर्घकालीन उपाययोजना करेपर्यंत कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंत महामार्गावरील उजव्या बाजूची मार्गिका केवळ जड वाहनांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत नवले पूल परिसरात होणारे अपघात कमी झाले आहे. मात्र, रविवारी झालेला अपघात भीषण होता. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी आणखी प्रभावी उपाययोजना अमलात आणण्यात येणार आहेत. त्याकरिता एका स्वयंसेवी संस्थेला काम देण्यात आले आहे. येत्या आठवडाभरात त्यांचा अहवाल येईल.

हेही वाचा:नवले पूलावरील अपघात ब्रेक निकामी झाल्यामुळे नाही; ‘आरटीओ’चा अहवाल पोलिसांना सादर

तत्पूर्वी कात्रज बोगदा ते नवले पूल या सात किलोमीटरच्या परिसरात जड वाहनांसाठी उजव्या बाजूची स्वतंत्र मार्गिका करण्यात यावी. हे बदल लक्षात येण्यासाठी कात्रज बोगदा संपल्यानंतर एक तपासणी नाका उभा करून तेथे कायम एक पोलीस तैनात असेल. तसेच या ठिकाणी मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा विविध भाषांतील मोठे फलक लावण्यात येणार आहेत. याशिवाय वेगाला अडथळा आणण्यासाठी या सात कि.मीमध्ये आतापेक्षा जास्त उंचीचे रम्बल स्ट्रीप बसविण्यात येणार असून बोगद्यापासून नवले पुलापर्यंत जड वाहने न्युट्रल करू नये, यासाठी उद्घोषणा कक्षाद्वारे चालकांना सांगण्यात येणार आहे आणि पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पादचारी उन्नत मार्ग (स्कायवॉक) उभारण्यात येतील.’

हेही वाचा:पुणे विद्यापीठात गणेश अथर्वशीर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम

उपाययोजनांनंतर अपघात कमी होण्याचा दावा

नवले पुलावर जास्त उतार असल्याने अपघात होत आहेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे, तर हा उतार योग्य असल्याचे एनएचएआयचे म्हणणे आहे. या दोन्ही यंत्रणांत मतभेद आहेत. मात्र, नवले पूल पाडणे हा त्यावरचा उपाय नाही, असे स्पष्ट करत पाटील यांनी अपघात टाळण्यासाठी नियुक्त केलेल्या स्वयंसेवी संस्थेने सुचविलेल्या उपायांमुळे अपघात कमी होतील, असा दावा या वेळी केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Only the right hand lane will be used for heavy vehicles on navale bridge katraj tunnel pune print news tmb 01
First published on: 26-11-2022 at 10:54 IST