गंगा नदीत दूषित पाणी सोडणारे ४५ उद्योग बंद करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही वापरलेले पाणी शुद्ध न करता नदीत सोडणाऱ्या कारखानदारांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘एनव्हायरो व्हिजन’ च्या उद्घाटन समारंभात रविवारी दिला.
रोटरी क्लब ऑफ पुणे, हडपसर यांच्यावतीने ‘एनव्हायरो व्हिजन’ या पर्यावरण विषयक चर्चासत्राचे उद्घाटन जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी घेण्यात आलेल्या चर्चासत्रात विश्वंभर चौधरी, भरत शितोळे, हेमंत जगताप, एन. आर. करमळकर, संजय आठवले, महेंद्र घागरे, विश्वास देवकर, विनोद बोधनकर, डॉ. जी. एन. कुलकर्णी, अनिल मेहेरकर सहभागी झाले होते. या वेळी रोटरी प्रांतपाल विवेक अरहाना, रोटरी हडपसर क्लब चे अध्यक्ष अनिल शितोळे, पर्यावरण विभाग प्रमुख मकरंद टिल्लू आदी उपस्थित होते.
या वेळी जावडेकर म्हणाले, ‘गंगा नदी संवर्धनासाठी कार्यक्रम राबवण्यात येत असताना प्रदूषित पाणी नदीत सोडणाऱ्या ९०० कारखान्यांना नोटिसा देण्यात आल्या असून ४५ कारखाने बंद करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे जल, वायू, हवा प्रदूषण रोखणे आणि कचरा व्यवस्थापनासाठी शहरांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून चांगले काम करणाऱ्या शहरांना केंद्र सरकारकडून निधी देण्यात येईल. पर्यावरण संवर्धनासाठी कायद्याच्या कडक अंमलबजावणी बरोबरच समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. जनतेच्या सहभागाशिवाय कायद्याच्या अंमलबजावणीला यश येऊ शकत नाही. पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी आंदोलन उभे केले पाहिजे. पर्यावरणाच्या ऱ्हासाबाबत भीती घालण्यापेक्षा जनजागृती करणे आणि सामाजिक मानसिकता बदलणे आवश्यक आहे.’