लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: वर्धा जिल्ह्यातील येसंबा गावाजवळच्या पठारावर पुरातत्त्वीय लोहयुगीन काळातील ७१ महापाषाणीय शीलावर्तुळे उजेडात आली आहेत. डेक्कन कॉलेजमध्ये पीएच.डी. करत असलेल्या ओशिन बंब या संशोधक विद्यार्थ्याने हे संशोधन केले असून, ही शीलावर्तुळे अंदाजे अडीच हजार वर्षांपूर्वीची आहेत.

‘जर्नल ऑफ हिस्ट्री आर्किआलॉजी अँड आर्किटेक्चर’ या संशोधनपत्रिकेत या शीलावर्तुळांचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. विदर्भात लोहयुगीन अनेक स्थळे अस्तित्वात आहेत. ब्रिटिशांनंतर नागपूर विद्यापीठ, डेक्कन कॉलेज आणि राज्य पुरातत्त्व विभागाचे वेगवेगळ्या ठिकाणी संशोधन सुरू आहे. येसंबा येथे सापडलेल्या शीलावर्तुळाच्या रचनेमध्ये बाहेर मोठे दगड वेगवेगळ्या आकाराचे आणि आतमध्ये लहान दगड आहेत.

हेही वाचा… पुणे : वृक्षतोड नव्हे, नदीकाठावर हरितपट्टा; ६५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा

आतापर्यंत विविध ठिकाणी झालेल्या उत्खननातून समोर आले आहे, की तत्कालीन समाजात आपल्या मृत पूर्वजांना अत्यंत आदरपूर्वक आणि विशिष्ट पद्धतीने जमिनीत पुरण्याची पद्धत होती. मृत व्यक्तीच्या संबंधित लोखंडी, ताम्र आणि मिश्रधातूची अवजारे, तर कधी मृत व्यक्तीसोबत पशूचे दफन केले जात होते. येसंबा येथेही अशा प्रकारची पद्धत प्रचलीत असावी. कदाचित पुनर्जन्म आणि मृत व्यक्तीबद्दल आदरभाव या कारणांमुळे तत्कालीन ग्रामीण संस्कृतीमध्ये ही विशेष दफनविधी परंपरेने प्रचलित होती. शीलावर्तुळाच्या आकारावरून आणि मिळालेल्या दफन सामग्रीवरून व्यक्तीच्या सामाजिक स्तराचा परिचय होतो, असे संशोधक ओशिन बंब यांनी सांगितले.

हेही वाचा… “एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांचा माझ्यावर राग आहे, कारण…”, रवींद्र धंगेकरांचा टोला; चंद्रकांत पाटलांवरही केली मिश्किल टिप्पणी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येसंबा येथील शीलावर्तुळे संरक्षित असणे आवश्यक आहे. कारण गिट्टी-मुरुम याचा अतिरेकी उपसा केल्याने हे स्थळ धोक्यात आल्याचे दिसून येते. ओशिन यांना ही शीलावर्तुळे शोधण्यासाठी स्थानिक रहिवासी पंचशील थूल यांनी सहकार्य केले. वर्धा जिल्ह्याच्या आणि विदर्भाच्या इतिहासात या संशोधनाने भर पडली आहे. तसेच याबाबत अधिक संशोधन होणे गरजेचे आहे, असे मत डेक्कन कॉलेजमधील प्रा. डाॅ. श्रीकांत गणवीर यांनी मांडले.