पुणे : साप्ताहिक सुट्टी असताना मद्याच्या नशेत एसटी बस चालविणाऱ्या चालकाला प्रवाशांनी रोखले. दुसरा संतोष माने होण्याची शक्यता टळली आणि चालकाला अटक करण्यात आल्यामुळे प्रवाशांचा जीव भांडय़ात पडला.

शिवाजीनगर एसटी बसस्थानकात बुधवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. प्रवाशांनी भरलेली पुणे-उस्मानाबाद ही एसटी बस निघण्याच्या तयारीत होती. अचानक एकजण चालकाच्या जागेवर बसला. त्याने बस सुरू केली आणि विद्युत वेगाने बस स्थानकाच्या बाहेर आणली. बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना काही तरी वेगळे घडत असल्याचे लक्षात आले. वाहक स्थानकातच होता आणि गणवेश परिधान न करताच चालकाने बस सुरू केली होती. प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला. त्यांच्यापैकी एकाने पुढे जाऊन पाहिले तर चालक दारूच्या नशेत असल्याचे दिसले. प्रवाशाने तातडीने बसचे स्टेअरिंग धरून चालकाला बस थांबविण्यास सांगितले. त्यामुळे तो बस सोडून पळू लागला. वेधशाळा चौकात असलेल्या पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले.   साप्ताहिक सुट्टी असतानाही या चालकाने मद्याच्या नशेत बस चालविल्याचे समोर आले.    शिवाजीनगर बस स्थानक ते वेधशाळा   चौकदरम्यान रात्री पावणेदहा वाजता हा प्रकार घडला.

अमोल विठ्ठल चोले (वय ३३, रा. ताडीवाला रोड) असे या बसचालकाचे नाव असून शिवाजीनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

जानेवारी २०१२च्या घटनेचे स्मरण..

जानेवारी २०१२ मध्ये स्वारगेट बसस्थानकातून संतोष माने या बसचालकाने  रोजी अशाच प्रकारे एसटी बस पळवून नेऊन सुमारे एक तास शहरात धुमाकूळ माजवला होता. त्यात त्याने अनेक वाहनांना धडक दिल्याने ९ जणांना प्राण गमवावे लागले होते, तर २७ जण जखमी झाले होते.